श्री श्री रवि शंकर यांचा लातुरात महासत्संग

 श्री श्री रवि शंकर यांचा लातुरात महासत्संग 

  लातूर/ प्रतिनिधी: आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते व अध्यात्मिक क्षेत्रात जागतिक पातळीवर प्रसिद्ध असणारे श्री श्री रवि शंकर गुरुजी दि. 9  सप्टेंबर रोजी लातूर येथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत महासत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील नागरिक व साधकांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
  श्री श्री रवि शंकर गुरुजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक असून ताण- तणाव व्यवस्थापन, अध्यात्मिक मार्गदर्शन आणि मानवी कल्याणाच्या कार्यासाठी ते ओळखले जातात.शांती,सौहार्द व समग्र कल्याणाला त्यांनी प्रोत्साहन दिले आहे.जगातील 180 हुन अधिक देशात श्री गुरुजींच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे. आपत्ती निवारण, शिक्षण आणि युवा विकास, संघर्ष निराकरण, आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरण, तुरुंग पुनर्वसन, पर्यावरण संवर्धन, नदी पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण, पाणी संवर्धन नद्यांमधील गाळ काढणे, वृक्ष लागवड आदी क्षेत्रात आर्ट ऑफ लिव्हिंगचे मोठे कार्य आहे.
  यापूर्वी 2009 व 2016 मध्ये गुरुजी लातूर येथे आलेले आहेत. गुरुजींचा हा तिसरा लातूर दौरा आहे. जिल्ह्यातील जवळपास दीड लाख साधकांनी आजवर विविध कोर्सेसच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे.
  दि. 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8 या कालावधीत  हा महासत्संग होणार आहे.बसस्थानक क्रमांक 2 समोरील यशोदा ज्वेलर्स ग्राउंड, शेठ सत्यनारायण अग्रोया मार्ग येथे हा महासत्संग होणार आहे. यासाठी शेतकरी व जिल्ह्यातील सर्व सरपंचांना निमंत्रित करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातील नागरिक आणि साधकांनी या महासत्संगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्यावतीने राजकुमार गिरवलकर, राजेंद्र कोळगे, दत्तात्रय पत्रावळे, कैलास जगताप, संतोष गिरवलकर,संदीप नवटाके व संतोष सलगरे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने