‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून लातूर जिल्ह्यात आरोग्य तपासणी शिबिरामधून ६७ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून लातूर जिल्ह्यात आरोग्य तपासणी शिबिरामधून ६७ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
लातूर/प्रतिनिधी -गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे हजारो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला आहे. श्री गणेश स्थापना ते श्री अनंत चतुर्दशीपर्यंत सदर उपक्रमामधून सार्वजनिक, धर्मादाय अंतर्गत तसेच खाजगी आरोग्य संस्थांच्या मार्फत संबंधित संस्था तथा विशेषतः सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली.

लातूर जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर दरम्यान १०५३ आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांतून ६७ हजार ९९८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता सल्ला देऊन संबंधित करण्यात आले आहे. मोफत आरोग्य तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये ३० हजार ६८६ पुरुष, ३२ हजार ५६२ महिला आणि ४ हजार ७५० बालकांचा समावेश आहे. 

या अभियानात लातूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण, निमशहरी, शहरी अशा सर्व स्तरावरील सार्वजनिक आरोग्य संस्था, धर्मादाय नोंदणीकृत अंतर्गत आरोग्य संस्था, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना संलग्नित रुग्णालय, मुख्यमंत्री सहायता निधी योजना संलग्नित रुग्णालय आणि विविध वैद्यकीय महाविद्यालय यांचा समावेश आहे. या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील लहान खेड्यापासून ते लातूर महानगरपालिकेतील विविध गणेश मंडळांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्ह्यात मोठ्या संख्येतील श्री गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने