सेवा संकल्प अभियान आणि श्री गणेश आरोग्याचा अभियानांतर्गत लातूर जिल्हा परिषदेत रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद
लातूर/ प्रतिनिधी: राज्य शासनाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या संकल्पनेतून २४ सप्टेंबर २०२६ रोजी लातूर जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी रक्तदान, रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये जिल्हा परिषदेतील तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. तसेच रक्तदाब व रक्तशर्करेची तपासणी करून घेतली. शिबिरादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले असून त्या माध्यमातून उच्च रक्तदाब व मधुमेहाचे प्राथमिक निदान, आरोग्य तपासणी आणि वेळेवर उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले, तसेच रक्तदानाचे महत्त्व आणि नियमित आरोग्य तपासणीबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली.
या शिबिरासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीतील अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. शिबिरामध्ये एकूण १२३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये ७५ पुरुष व ४८ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तसेच १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
या शिबिरास मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी तसेच लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांनी भेट देऊन स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली. हे शिबिर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिबिराच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाचे कौतुक केले आणि या शिबीरामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा