महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालतीमध्ये लातूर तालुक्यातील ३५ महसुली दावे निकाली

महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालतीमध्ये लातूर तालुक्यातील ३५ महसुली दावे निकाली
लातूर : महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्याकडील अर्थन्यायिक न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले दावे विधी सेवा प्राधिकरणांमार्फत राबविल्या जाणाऱ्या लोकअदालतीच्या धर्तीवर दोन्ही पक्षांच्या सहमतीने व तडजोडीने कायमस्वरूपी निकाली महसूल लोक अदालत अभियानाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ३० सप्टेंबर २०२६ रोजी लातूर तहसीलदार कार्यालय येथे आयोजित महसूल लोक अदालतीमध्ये ३५ महसुली दावे निकाली काढण्यात आले.
यावेळी लातूर तालुक्यातील ९ मंडळ अधिकारी यांच्याकडील महसुली प्रकरणे, तसेच तहसील कार्यालयातील रस्तेविषयक प्रकरणातील महसुली दावे व रस्ते विषयक दाव्यातील पक्षकारांचा आपापसात समेट घडवून आणण्यात आला. या लोकअदालतीत एकूण ६० प्रकरणे ठेवण्यात आली होती. 
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर आणि लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली या महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या महसूल लोकअदालतीसाठी तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार गणेश सरोदे, सुचिता हंकारे, सर्व मंडळ अधिकारी, तसेच सहाय्यक महसूल अधिकारी अविनाश साठे व महसूल सहायक दत्ता कतलाकुटे यांनी परिश्रम घेतले. या लोकअदालतीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त करून वारंवार अशा प्रकारच्या लोकअदालती घ्याव्यात, अशी भावना व्यक्त केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने