नागरी बँकांच्या प्रश्नांवर 12 ऑक्टोबरला लातूरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक

 नागरी बँकांच्या प्रश्नांवर 12 ऑक्टोबरला लातूरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक

लातूर-लातूर जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांसमोरील विविध प्रश्न, प्रशासकीय बाबी आणि बदलत्या बँकिंग नियामक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, दि. 12 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.या बैठकीला असोसिएशनचे उपाध्यक्ष (व्हाइस चेअरमन) सुहास पाचपुते यांच्यासह सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सभासद नागरी सहकारी बँकांच्या कामकाजाशी संबंधित आर्थिक, नियामक, तांत्रिक आणि कायदेशीर विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.आर्थिक वर्ष 2025-26 च्या ताळेबंदपत्रकासंदर्भातील बाबींचा आढावा घेण्याबरोबरच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांच्या नवीन परिपत्रकांनुसार सभासद बँकांसाठी आवश्यक धोरणे तयार करणे, त्यासाठीच्या खर्चास मान्यता देणे आदी विषय बैठकीच्या अजेंड्यावर आहेत. तसेच बँकिंग क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी बँकांमधील कर्मचारी व अधिकार्‍यांसाठी तंत्रज्ञानविषयक कार्यशाळा आयोजित करण्याबाबतही चर्चा होणार आहे.बँकिंग आणि सहकार कायद्यांमध्ये झालेल्या विविध बदलांची माहिती सभासद बँकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कायदेविषयक कार्यशाळा घेण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याशिवाय सभासद बँकांना भेडसावणार्‍या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी समन्वयाने प्रयत्न करण्यावर भर दिला जाणार आहे.शेती व शेतीपूरक कर्जवसुलीच्या शासन निर्णयावर चर्चा-महाराष्ट्र शासनाने 25 सप्टेंबर रोजी शेती व शेतीशी निगडित कर्जांच्या वसुलीबाबत कार्यवाही न करण्यासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयातील तरतुदी, त्यांची व्याप्ती आणि सभासद बँकांच्या कामकाजावर होणारे संभाव्य परिणाम याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. संबंधित शासन निर्णय व लागू नियमांच्या अनुषंगाने बँकांनी कोणती कार्यपद्धती अवलंबावी, याबाबत विचारविनिमय केला जाणार आहे. या बैठकीत आयत्यावेळी उपस्थित होणार्‍या विषयांवरही चर्चा करून लातूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या माध्यमातून पुढील काळात राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची दिशा निश्चित केली जाणार आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीस सर्व संचालक व सभासद बँकांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सराफ यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم