चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करून चारा उपलब्ध करून द्या : डॉ. नीलम गोऱ्हे

चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करून चारा उपलब्ध करून द्या : डॉ. नीलम गोऱ्हे

उदगीर  : चाऱ्याची आवश्यकता असलेल्या गावांची तातडीने पाहणी करून गरजू शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गावातच सोमवार, दि. १२ ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिल्या. दुष्काळी उपाययोजनांबाबत २५ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित झाला असतानाही गंभीर दुष्काळग्रस्त भागात आवश्यक पाहणी झालेली दिसत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

मराठवाडा दौऱ्यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी उदगीर तालुक्यातील करडखेल आणि दिग्रज येथील शेतांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नांचा आढावा घेतला.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कैलास माने यांच्या शेतात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली व शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार सुधाकर भालेराव, शिवसेना उपनेत्या कला शिंदे, संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी, संगीता चव्हाण, सुनीता मोरे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोळ, सरपंच पांडुरंग ढगे, शेतकरी बापुराव माने, श्रीकांत कोंबले, विकास सोसायटीचे चेअरमन कुमार पाटील, बालाजी पडोळे, रोगनाथ गंगाराम ढगे आदी उपस्थित होते.

शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करा

शासनाने निर्णय घेतल्यानंतर त्याचा लाभ प्रत्यक्ष गावापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शेतकरी चारा उपलब्ध नसल्याची व्यथा सातत्याने मांडत असताना प्रशासनाने गावनिहाय पाहणी करून जनावरांची संख्या आणि चाऱ्याच्या गरजेची माहिती यापूर्वीच संकलित करायला हवी होती, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

तलाठी, सरपंच आणि संबंधित यंत्रणांनी जनावरांची व त्यांच्या मालकांची यादी तातडीने तयार करून खातरजमा करावी. त्या आधारे चारा पुरवठ्याचे नियोजन करून सोमवारपर्यंत गावात चारा पोहोचवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. ग्रामस्थांनी सुमारे दोन हजार जनावरांसाठी चाऱ्याची गरज मांडली असून, याबाबत जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी व शेतमजुरांना भरीव मदत द्या : सुधाकर भालेराव
माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पिकांवर केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे सांगितले. विहिरी व बोअरवेलचे पाणी आटत असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत, कर्जमाफी, वीजबिलात दिलासा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणी भालेराव यांनी केली. भूमिहीन शेतमजुरांसाठीही आर्थिक सहाय्य व रोजगाराची व्यवस्था करावी. प्रशासकीय प्रक्रियेमुळे मदतीला विलंब होऊ न देता तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पाणी, रोजगार आणि आरोग्याच्या प्रश्नांवरही पाठपुरावा
पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक टँकरची व्यवस्था, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती आणि शासन निर्णयातील सवलतींच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. रोजगार हमीअंतर्गत कामे सुरू करून शेतमजुरांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा आणि स्थलांतर टाळता यावे, यावर त्यांनी भर दिला.
पाणीपुरवठ्याच्या पात्र कामांसाठी आमदार निधीतून ₹२५ लाखांपर्यंत मदत करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली. चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी आमदार निधी वापरण्याची परवानगी मिळू शकते का, याची तपासणी करून शासनाकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सामाजिक संस्था व सीएसआर निधीच्या माध्यमातून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य व पोषणाच्या गरजांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
“दुष्काळाचा प्रश्न राजकारणापलीकडचा आहे. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे,” असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने