लातूर विद्यार्थिनी लैंगिक छळप्रकरणी गोपनीय तक्रारींसाठी स्वतंत्र क्रमांक जाहीर करा : डॉ. नीलम गोऱ्हे
लातूर : लातूरमधील शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थिनींच्या कथित विनयभंग व लैंगिक छळप्रकरणी मुली आणि पालकांना निर्भयपणे तक्रार करता यावी, यासाठी लातूर पोलिसांनी स्वतंत्र संपर्क क्रमांक जाहीर करावा. तक्रारदार मुलींची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवून त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
या प्रकरणातील आरोपी बशीर शेख याला अटक झाली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची प्राथमिक माहिती मिळाल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. सखोल तपास आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांना निवेदन देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी घाबरून न जाता पुढे यावे. त्यांची नावे आणि ओळख गोपनीय ठेवून तक्रारी नोंदविण्यासाठी पोलिसांनी सुरक्षित व विश्वासार्ह व्यवस्था उपलब्ध करून द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
या संस्थेत पूर्वी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थिनींनाही डॉ. गोऱ्हे यांनी कळकळीचे आवाहन केले. “तुम्हालाही पूर्वी असा त्रास झाला असेल किंवा संबंधित घटनांची माहिती असेल, तर कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांना माहिती द्या. आपल्या लहान बहिणींना असा त्रास पुन्हा होऊ नये, यासाठी तुमचे पुढे येणे महत्त्वाचे आहे,” असे त्या म्हणाल्या.
केवळ समाजमाध्यमांवर माहिती व्हायरल करून किंवा माध्यमांतून निषेध व्यक्त करून थांबणे पुरेसे नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्याकडे संबंधित पुरावे आहेत, त्यांनी ते सुरक्षित ठेवून पोलिसांकडे सुपूर्द करावेत. ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायालयीन कारवाई होऊन दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शिक्षण विभागाने संस्थेची सखोल चौकशी करून मान्यता रद्द करण्यासाठी नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. संस्थेतील प्राचार्य किंवा व्यवस्थापनाकडून आरोपीला संरक्षण देण्यात आले का आणि विद्यार्थिनींवर दबाव आणला जात आहे का, याचीही चौकशी व्हावी, असे त्यांनी नमूद केले.
“मुलींची सुरक्षितता आणि त्यांना न्याय मिळवून देणे याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. या संस्थेवर कारवाई करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची तातडीने भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे,” असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
إرسال تعليق