विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बाह्यरुग्ण नोंदणीसाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही !

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बाह्यरुग्ण नोंदणीसाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही !

लातूर :  भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत नागरिकांना जलद व सुलभ ओपीडी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे ‘स्कॅन अँड शेअर’ ही आधुनिक डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे रुग्णांना ओपीडी नोंदणीसाठी दीर्घकाळ रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आलेला आभा क्यूआर कोड स्कॅन करून काही मिनिटांत ओपीडी नोंदणी प्रक्रिया सुरू करता येणार  आहे. त्यामुळे रुग्णांचा वेळ वाचण्यासोबतच नोंदणी प्रक्रिया अधिक जलद व सुलभ होणार आहे.
असा करा ‘स्कॅन अँड शेअर सुविधेचा वापर
  आरोग्य सेतु ॲप अथवा आभा ॲप डाऊनलोड करुन रुग्णालयात प्रदर्शित करण्यात आलेला ‘स्कॅन अँड शेअर’ क्यूआर कोड स्कॅन करावा. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर आपल्या ‘आभा’ प्रोफाइलमधील आवश्यक माहिती रुग्णालयास शेअर करावी. त्यानंतर ओपीडी नोंदणीसाठी टोकन क्रमांक प्राप्त होईल. प्राप्त झालेल्या टोकन क्रमांकानुसार सहा नंबर ओपीडी नोंदणी काऊंटरवर जाऊन आवश्यक शुल्क भरावे व ओपीडी पेपर घेऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आधार व आभा कार्ड सोबत आणण्याचे आवाहन 
रुग्णांनी उपचारासाठी रुग्णालयात येताना आधार कार्ड आणि आभाकार्ड किंवा क्रमांक सोबत आणावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. आभाशी आरोग्य नोंदी जोडल्यास रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, तपासण्या, औषधोपचार, निदान अहवाल आणि इतर आरोग्यविषयक माहिती सुरक्षित डिजिटल स्वरूपात जतन करता येते. त्यामुळे भविष्यातील उपचार अधिक अचूक, जलद आणि परिणामकारक होण्यास मदत होते.आयुष्मान भारत डिजिटल मिशनअंतर्गत उपलब्ध विविध डिजिटल आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ सुलभपणे मिळविण्यासाठी आधार कार्ड व आभा नोंदणी उपयुक्त ठरणार आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे उपचारासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांनी आधार कार्ड व आभा कार्ड तथा क्रमांक सोबत आणून ‘स्कॅन अँड शेअर’ सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने