फार्मसीच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संशोधनाची संधी: आ. बसवराज पाटील


शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अत्याधुनिक 'संशोधन केंद्रा'चे शानदार उद्घाटन

फार्मसीच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संशोधनाची संधी: आ. बसवराज पाटील
औसा (विशेष प्रतिनिधी): श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, आलमला संचलित शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नूतन अत्याधुनिक संशोधन केंद्राचा (रिसर्च सेंटर) भव्य उद्घाटन सोहळा सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या नूतन केंद्राचे उद्घाटन विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बी. व्ही. मोतीपवळे उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, माधव पाटील टाकळीकर, शिरीष उटगे , संगमेश्वर ठेसे, जयशंकर हुरदळे, सिध्दलिंग निलंगेकर, विश्वनाथ निलंगेकर, कैलास निलंगेकर, अमर हजारी आणि प्रशासकीय अधिकारी योगेश धाराशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार बसवराज पाटील म्हणाले की, "श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाने विविध क्षेत्रांत आपल्या दर्जेदार कार्याचा ठसा उमटविला आहे. महाविद्यालयात सुरू झालेले हे नवीन रिसर्च सेंटर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संशोधनाची संधी मिळवून देण्यासाठी मैलाचा दगड ठरेल."

प्रमुख पाहुणे बी. व्ही. मोतीपवळे यांनी विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती आणि आजच्या काळातील आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक भाषण करताना संस्थेचे सचिव बसवराज धाराशिवे यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि भावी उद्दिष्टांचा विस्तृत आढावा घेतला. या डिजिटल युगात हे संशोधन केंद्र फार्मसीच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे संशोधन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.

या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वेश्वर धाराशिवे यांना अधिकृत 'रिसर्च सेंटर मान्यता पत्र' प्रदान करण्यात आले. तसेच डॉ. समीर शफी आणि डॉ. सुरज मालपाणी यांना 'संशोधक मार्गदर्शक' (रिसर्च गाईड) मान्यता पत्र देऊन गौरविण्यात आले. याचसोबत 'अविष्कार' व 'अन्वेषण' संशोधन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात डॉ. सुरज मालपाणी, विकास मुगळे व मयुरी चंद्रवंशी लिखित 'इंटरनॅशनल बुक चॅप्टर' या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याला विश्वेश्वरय्या इन्स्टीट्युट ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलास कापसे, विश्वेश्वरय्या आयटीआय प्राचार्य ऋतिक धाराशिवे, विभाग प्रमुख प्रतिक धाराशिवे, ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या स्वाती कापसे, ब्ल्यू बर्ड ज्युनीअर सायन्स कॉलेजचे प्राचार्य योगेश माशाळकर यांच्यासह प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने