स्त्रीच्या अभिव्यक्तीला बळ देण्यासाठी विविध पिढ्यांतील लेखिकांचा संवाद आवश्यक : आ.डॉ. नीलम गोऱ्हे

स्त्रीच्या अभिव्यक्तीला बळ देण्यासाठी विविध पिढ्यांतील लेखिकांचा संवाद आवश्यक : आ.डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यात २४ ऑक्टोबरला स्त्रीवादी साहित्य संमेलन; डॉ. छाया महाजन संमेलनाध्यक्ष
पुणे : स्त्रियांचे अधिकार, विकास आणि सक्षमीकरण यांविषयी स्त्रिया व पुरुषांनी केलेली साहित्यनिर्मिती हा स्त्रीवादी साहित्याचा व्यापक आशय आहे. बदलत्या सामाजिक आणि डिजिटल वास्तवात विविध पिढ्यांतील लेखिकांनी एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे. स्त्रीवादी साहित्य संमेलनातून ज्येष्ठ आणि नवोदित लेखिकांमध्ये संवाद घडवून स्त्रीच्या अभिव्यक्तीला बळ देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि स्त्री आधार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी स्त्रीवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील के. बी. जोशी सभागृह, कर्वेनगर, पुणे येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे संमेलन होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे आणि योगेश सोमण यांनी संमेलनाची माहिती दिली. यावेळी स्वाती महाळंक, प्रदीप निफाडकर उपस्थित होते.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या ९९ नांदी संमेलनांच्या उपक्रमांतर्गत हे संमेलन होत आहे. ज्येष्ठ लेखिका डॉ. छाया महाजन संमेलनाध्यक्ष आहेत. उद्घाटन सत्रासाठी उपमुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.श्री चंद्रकांत पाटील आणि उद्योग व मराठी भाषा मंत्री मा.ना.श्री उदय सामंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ज्येष्ठ लेखिका मलिक अमर शेख, मंगला गोडबोले आणि योगेश सोमण यांनाही उद्घाटन सत्रासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
कवयित्री संमेलन आणि स्त्रीच्या लेखनप्रवासावर संवाद
दुपारी १.४५ ते ३ या वेळेत कवयित्री संमेलन होणार असून, त्यासाठी डॉ. प्रिया जामकर, सुप्रिया हळवे, विशाखा विश्वनाथ, डॅा.संगीता बर्वे, पद्मरेखा धनकर, योगिनी सातारकर पांडे आणि कल्पना दुधाळ यांना निमंत्रित केले आहे. अंजली कुलकर्णी सूत्रसंचालन करतील.
दुपारी ३ ते ४ या वेळेत ‘माध्यमातील स्त्रीवादाचा आविष्कार’ या परिसंवादासाठी कल्याणी हर्डीकर, प्रतिमा कुलकर्णी, रोहिणी निनावे, किरण येले आणि डॉ. नैना कासखेडीकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पत्रकार राही भिडे या सत्राच्या सूत्रधार असतील.
दुपारी ४.१५ ते ५.३० या वेळेत ‘मी का लिहिते?’ या सत्रातून लेखिकांचा सर्जनशील प्रवास, अभिव्यक्तीमागील प्रेरणा आणि लेखन करताना येणाऱ्या अडचणींवर संवाद होईल. मुक्ता चैतन्य या सत्राच्या सूत्रधार असतील. समारोप सत्रात रेखा इनामदार साने, डॉ. कांता नलावडे, स्वाती महाळंक आणि डॉ. गोऱ्हे विचार मांडतील. डॉ. छाया महाजन यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर संमेलनाचा समारोप होईल.
स्त्रीला व्यक्त होताना कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक दृष्टिकोन आणि विविध अडथळ्यांमधून वाटचाल करावी लागते. त्यामुळे तिचा सर्जनशील प्रवास समजून घेणे महत्त्वाचे आहे. जागतिकीकरण, स्थलांतर आणि डिजिटल माध्यमांमुळे बदललेल्या अनुभवविश्वाचे प्रतिबिंबही या संवादातून समोर यावे, अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
स्त्री लेखिकांच्या योगदानाचे प्रदर्शन; चर्चांचे दस्तावेजीकरण संमेलनस्थळी स्त्री लेखिकांचे जीवनचरित्र आणि साहित्यिक योगदान उलगडणारे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. प्रदीप निफाडकर यांच्या संयोजनातून हे प्रदर्शन साकारले जात आहे. सुमारे २०० निमंत्रित प्रतिनिधींमध्ये लेखिका, प्राध्यापिका, कार्यकर्त्या आणि लेखनाची आवड असलेल्या महिलांचा समावेश असेल.
संमेलनाचे चित्रीकरण आणि थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ‘मी का लिहिते?’ आणि माध्यमांतील स्त्रीप्रतिमेसारख्या विषयांवरील चर्चांचे शक्यतेनुसार पुस्तिकेच्या स्वरूपात दस्तावेजीकरण करण्याचा प्रयत्न राहील, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. समाजमाध्यमांवर व्यक्त होणाऱ्या तरुण लेखिकांना आणि बाहेरगावच्या महिलांना शक्यतेनुसार ऑनलाइन जोडून घेण्याचाही प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
साहित्यिक नेतृत्वात महिलांचा सहभाग वाढावा
शंभराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महिलेला संधी देण्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर, ही सूचना विचार करण्यासारखी असून संमेलनात विषय चर्चेला आल्यास त्यावर विचार केला जाईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. साहित्य, प्रसारमाध्यमे आणि विविध क्षेत्रांतील नेतृत्व व निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
साधेपणा आणि काटकसरीतून साहित्यिक दर्जा जपणार : योगेश सोमण
नियोजित ९९ नांदी संमेलनांचा उपक्रम पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचे योगेश सोमण यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीचे भान राखून संमेलने साधेपणाने आणि काटकसरीने आयोजित करण्याच्या सूचना संयोजकांना देण्यात आल्या आहेत. शक्य तेथे अर्धदिवसीय संमेलने घ्यावीत, अतिरिक्त मंडप व अनावश्यक खर्च टाळून सभागृहांमध्ये कार्यक्रम करावेत आणि आशयपूर्ण परिसंवादांना प्राधान्य द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
साधेपणा राखताना संमेलनांचा साहित्यिक दर्जा उत्तम राहील, याची काळजी घेतली जाईल. तसेच नांदी संमेलनांतील अध्यक्षीय भाषणांचे संकलन करून त्यांचा दस्तावेज तयार करण्याचे नियोजन असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले.
संमेलनाची माहिती अधिकाधिक नवोदित लेखिका, विद्यार्थिनी आणि साहित्यप्रेमींपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने