लातूर जिल्ह्यातील वृत्तपत्र मालकांची बैठक संपन्न

लातूर जिल्हा वृत्तपत्र मालक समितीची घोषणा

अनधिकृत व नोंदणी रद्द झालेल्या वृत्तपत्रांच्या छपाईवर कारवाईची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

लातूर जिल्ह्यातील वृत्तपत्र मालकांची बैठक संपन्न 
लातूर, प्रतिनिधी : वृत्तपत्र व्यवसायासमोरील वाढत्या अडचणी, आर्थिक संकट तसेच वृत्तपत्रांच्या नियमबाह्य छपाईच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्रांच्या मालकांची बैठक सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी शासकीय विश्रामगृह, लातूर येथे ज्येष्ठ पत्रकार नरसिंग घोणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत ‘लातूर जिल्हा वृत्तपत्र मालक समिती, लातूर’ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली.

सध्या वृत्तपत्र व्यवसायासमोर वाढती महागाई, कागदाचे वाढते दर, छपाई खर्चातील वाढ आणि जाहिरातींच्या घटत्या प्रमाणामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मागील काही वर्षांत छपाईचे दर वाढले असताना जाहिरात दरांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे वृत्तपत्र मालकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे बैठकीत उपस्थितांनी निदर्शनास आणून दिले.
याशिवाय वृत्तपत्र प्रकाशित झाल्यानंतर ४८ तासाच्या निर्धारित कालावधीत त्याची प्रत प्रेस सेवा पोर्टलवर अपलोड करणे, संबंधित पत्र सुचना कार्यालय पुणे कडे प्रती जमा करणे, वार्षिक विवरणपत्र वेळेत सादर करणे आदी विविध नियमांचे पालन करावे लागत आहे. नियमांचे पालन करताना होणाऱ्या अडचणी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दंडात्मक तरतुदींवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
दरम्यान, PRGI कडील नोंदणी रद्द झालेली किंवा अनियमित असलेली काही वृत्तपत्रे केवळ दिवाळी, निवडणुका, वाढदिवस किंवा अन्य कार्यक्रमांच्या जाहिरातींसाठी छापली जात असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. अशा प्रकारे नियमांचे पालन न करता वृत्तपत्र छापले जात असल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणेकडे माहिती देऊन नियमानुसार कारवाई व्हावी, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
नोंदणी रद्द झालेल्या किंवा नियमबाह्य पद्धतीने प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांची माहिती संकलित करून, आवश्यक पुराव्यांसह जिल्हाधिकारी, लातूर यांच्याकडे निवेदन सादविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच अशा प्रकारच्या वृत्तपत्रांची छपाई करणारे प्रकाशक तसेच नियमबाह्य छपाई करून देणाऱ्या मुद्रणालयांबाबतही संबंधित कायदे व नियमांनुसार कार्यवाही करण्याची मागणी करण्याचे ठरले.

वृत्तपत्र मालकांच्या विविध समस्या शासनस्तरावर मांडणे, वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित नियमांची माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, अनधिकृत छपाईबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी संबंधित प्रशासनाशी समन्वय साधणे आणि वृत्तपत्र मालकांच्या न्याय्य प्रश्नांसाठी संघटितपणे पाठपुरावा करणे, या उद्देशाने लातूर जिल्हा वृत्तपत्र मालक समिती कार्यरत राहणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत वृत्तपत्र मालकांसमोरील आर्थिक, प्रशासकीय, जाहिरात, छपाई तसेच शासनाच्या विविध नियमांशी संबंधित प्रश्नांवरही विचारविनिमय करण्यात आला. जिल्ह्यातील वृत्तपत्र व्यवसाय अधिक शिस्तबद्ध, सक्षम आणि पारदर्शक पद्धतीने चालविण्यासाठी सर्व वृत्तपत्र मालकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीस नरसिंग घोणे, काकासाहेब घुटे, दत्तात्रय परळकर, लहुकुमार शिंदे, बालाजी वाघलगावे, अशोक कुलकर्णी, भारत जाधव, रविकिरण सूर्यवंशी, शिरीषकुमार शेरखाने, खंडेराव देडे, विठ्ठल तगलपल्लेवार, मारोती माने, डी. बी. ढगे, राघवेंद्र देबडवार, सोमनाथ स्वामी, वामन पाठक, महेश गाडेकर, राजकुमार गुडाप्पे, किशोर जाधव, राम कांबळे, राजेंद्र मोरे, भरत भोसले आदींसह लातूर जिल्ह्यातील विविध दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्रांचे मालक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने