लातूर बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांची दुरावस्था दूर करा; काँग्रेसचे एसटी विभागीय नियंत्रकांना निवेदन, आंदोलनाचा इशारा

लातूर बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांची दुरावस्था दूर करा; काँग्रेसचे एसटी विभागीय नियंत्रकांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
लातूर:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) लातूर विभागांतर्गत येणाऱ्या विविध बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था तातडीने दूर करून प्रवाशांना स्वच्छ आणि सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजी जवळगेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांना भेटून सविस्तर निवेदन सादर केले.  
लातूर विभागातील बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेबाबत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीची माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी अत्यंत गंभीर दखल घेतली होती. त्यांच्या सूचनेनुसार काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लातूर मध्यवर्ती बसस्थानकावर अचानक भेट देऊन पाहणी केली असता तेथील विदारक आणि धक्कादायक वास्तव समोर आले.  
*अस्वच्छता, दुर्गंधी आणि विदारक स्थिती*
बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छता आणि असह्य दुर्गंधी पसरल्याचे निदर्शनास आले. अनेक स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले किंवा बंद आहेत, वॉशबेसिनचे नळ गायब असून फरशा तुटलेल्या आहेत. सेप्टिक टँक तुंबल्यामुळे विष्ठा उघड्यावर पसरली असून परिसरात चालणेही कठीण झाले आहे. याशिवाय बसस्थानकातील उपहारगृहात (कॅन्टीन) कचऱ्याचे ढीग साचलेले असून तिथेही अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.  
*पिण्याच्या पाण्याचा अभाव आणि प्रवाशांची लूट*
स्थानकावर प्रवाशांसाठी मोफत व शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना २० रुपयांची पाण्याची बाटली विकत घ्यावी लागत असून ही नागरिकांची लूट असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. दसरा नुकताच झाला असून पुढील काही दिवसांत दिवाळीचा सण येत आहे; अशा काळात ग्रामीण भागातून हजारो नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले प्रवास करतात, मात्र या मूलभूत सुविधांअभावी त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 
*सुरक्षेचा अभाव आणि अनधिकृत वाहने*
बसस्थानक परिसरात अनधिकृतपणे दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जात असल्याने प्रवाशांना अडथळा निर्माण होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या पोलीस चौकीत पोलीस कर्मचारी उपलब्ध नसतात. परिणामी रात्रीच्या वेळी गर्दुल्ल्यांचा आणि मद्यपींचा वावर वाढला असून चेन स्नॅचिंग, पाकीटमारी यांसारख्या गुन्हेगारी घटनांत वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या आहेत.  
लातूर विभागातील सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांची अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा.  
नादुरुस्त दरवाजे, बेसिन, नळ व फरशांची तात्काळ दुरुस्ती करून २४ तास मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.  
प्रवाशांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.  
कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कंत्राटदार आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.  
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवून रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी.  
एसटी प्रशासनाने प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षेचा विचार करून तात्काळ ठोस पावले उचलावीत, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.  
या शिष्टमंडळात उपमहापौर स्नेहल उटगे, पप्पू देशमुख, प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, गिरीश ब्याळे, सिराज शेख, फारुक शेख, ॲड. देवीदास बोरुळे, आसिफ बागवान, पिराजी साठे, असलम चाऊस, बालाजी झिपरे, सय्यद मोईन, राजू गवळी,नितीन कांबळे,मनोज चिखले,पाशा शेख,मोहसीन कादरी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने