वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा राज्य अध्यक्षपदी श्री ष. ब्र. १०८ तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची निवड

वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा राज्य अध्यक्षपदी श्री ष. ब्र. १०८ तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची निवड
लातूर -वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक व संघटनात्मक कार्याला अधिक व्यापक दिशा देण्याच्या उद्देशाने वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा महाराष्ट्र या संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री क्षेत्र मन्मथ स्वामी देवस्थान, कपिलधार-मांजरसुंबा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेचे उपाध्यक्ष श्री ष. ब्र.डॉ. १०८ श्रीकंठ शिवाचार्य महाराज, नागनसूर, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवाचार्य महाराजांची उपस्थिती होती. बैठकीमध्ये वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक व आध्यात्मिक परंपरांचे संवर्धन, शिवाचार्यांचे संघटन, समाजप्रबोधन तसेच विविध सामाजिक उपक्रमांना चालना देण्याबाबत चर्चा करण्यात आली.बैठकीत वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्री ष. ब्र. १०८ तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
श्री ष.ब्र.१०८ तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर हे वीरशैव लिंगायत समाजातील अध्यात्मनिष्ठ, अभ्यासू, तपस्वी आणि समाजप्रबोधनाची भूमिका प्रभावीपणे पार पाडणारे शिवाचार्य म्हणून परिचित आहेत. वीरशैव लिंगायत धर्मपरंपरेतील मूल्ये, संस्कार, अध्यात्म आणि सामाजिक एकोपा यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले आहे.समाजातील विविध घटकांना धार्मिक व आध्यात्मिक मार्गदर्शन देतानाच शिक्षण, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि समाजातील ऐक्य यांना त्यांनी नेहमीच महत्त्व दिले आहे. त्यांच्या शांत, संयमी व समन्वयवादी नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील शिवाचार्यांना एका व्यापक संघटनात्मक व्यासपीठावर एकत्र आणण्यास निश्चितच बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या बैठकीत महासभेच्या नूतन कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. त्यामध्ये—
राज्य अध्यक्ष श्री ष. ब्र. १०८ तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर,
कार्याध्यक्ष शिवाचार्य रत्न श्री ष. ब्र. १०८ डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीरकर
उपाध्यक्ष-श्री ष. ब्र.१०८ गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर,सचिव -श्री ष. ब्र. १०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर
कोषाध्यक्ष- श्री ष. ब्र. १०८ महादेव शिवाचार्य वाईकर महाराज,प्रवक्ते -श्री ष.ब्र. १०८ अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतूरकर, सदस्य - श्री ष ब्र १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक व सामाजिक प्रश्नांवर संघटितपणे कार्य करणे, शिवाचार्य परंपरेचा गौरव व वारसा जपणे, समाजामध्ये आध्यात्मिक व सांस्कृतिक जागृती निर्माण करणे तसेच समाजातील विविध घटकांमध्ये समन्वय वाढविणे, या दृष्टीने महासभा आगामी काळात प्रभावीपणे कार्य करेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. श्री ष. ब्र. १०८ तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची राज्य अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व भक्तगण आणि समाजबांधवाकडून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने