इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; लातूर जिल्ह्यातील शाळांना विद्यार्थ्यांकडून फी न घेण्याचे निर्देश
लातूर : राज्य शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर केली असून, या तालुक्यांसाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. याच निर्णयांतर्गत दुष्काळग्रस्त भागातील शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. त्यानुसार फेब्रुवारी तथा मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी न घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांना दिले आहे. जिल्ह्यातील ८२ हजार ०७४ विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
संपूर्ण लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला कोणत्याही शाळेच्या मुख्याध्यापकांनी इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी वसूल करू नये, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. लातूर जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या ४७ हजार ५५५ आणि इयत्ता बारावीच्या ३४ हजार ५१९ अशा एकूण ८२ हजार ७४ विद्यार्थ्यांना या दुष्काळ सवलतीचा लाभ मिळणार आहे. लातूर तालुक्यात सर्वाधिक ३१,२१४, उदगीर तालुक्यात ११,७०१, अहमदपूर तालुक्यातील ८,६२२, निलंगा तालुक्यात ७,७९९, औसा तालुक्यात ७,४१५, चाकूर तालुक्यात ४,६९४, देवणी तालुक्यात ३,१९५, जळकोट तालुक्यात ३,१३४, रेणापूर तालुक्यात २,६७० आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात १,६३० विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.
إرسال تعليق