हरंगुळ रेल्वे स्टेशनसमोर लिफ्टसह पादचारी पूल उभारावा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे संजय निलेगावकर यांची आग्रही मागणी
लातूर : लातूर–येडशी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर हरंगुळ रेल्वे स्टेशनसमोर लिफ्टसह पादचारी पूल (FOB) उभारण्यात यावा, अशी मागणी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगावकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. रेल्वे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या पुलाच्या बांधकामाला प्राधान्याने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.हरंगुळ रेल्वे स्टेशन हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ ला लागून असल्याने या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची तसेच परिसरातील स्थानिक रहिवाशांची महामार्गावर मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र, या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने रस्ता ओलांडताना प्रवाशांना आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः रेल्वेने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघात घडल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर हरंगुळ रेल्वे स्टेशनसमोर राष्ट्रीय महामार्गावर लिफ्टसह पादचारी पूल उभारणे आवश्यक असल्याचे निलेगावकर यांनी पत्रात नमूद केले आहे. पादचारी पुलामुळे प्रवाशांना महामार्गावरील वाहतुकीचा अडथळा न येता सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येईल. तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि अन्य प्रवाशांनाही लिफ्टच्या सुविधेमुळे पुलाचा वापर करणे सुलभ होईल.
या मागणीची प्रत लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनाही देण्यात आली आहे. हरंगुळ रेल्वे स्टेशन परिसरातील वाढती वाहतूक, प्रवाशांची वर्दळ आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.रेल्वे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वरील हरंगुळ रेल्वे स्टेशनसमोरील लिफ्टसह पादचारी पुलाच्या बांधकामास तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी संजय निलेगावकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा