लातूर शहर मतदारसंघात १० आणि ११ ऑक्टोबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबीर आयोजन
लातूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत पात्र नागरिकांना मतदार यादीत आपले नाव नोंदविण्याची तसेच यादीतील नोंदींमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेषतः १ ऑक्टोबर २०२४ नंतर वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची प्रथमच संधी मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर २३५-लातूर शहर विधानसभा मतदारसंघात १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून हे शिबीर पार पडणार असून पात्र नागरिकांना नोंदणीसाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन व सहकार्य केले जाणार आहे. याशिवाय, लातूर शहरातील विविध महाविद्यालयांमध्येही नवमतदारांसाठी विशेष नोंदणी शिबीरे भरवली जाणार आहेत. शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करून पात्र नवमतदार विद्यार्थ्यांनी या शिबीरांचा लाभ घ्यावा यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र. ६ आणि नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्र. ८ उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना हे अर्ज ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. ऑनलाईन नोंदणी इच्छुकांसाठी https://voters.eci.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आणि ‘ईसीआयएनईटी’ हे मोबाईल ॲप उपलब्ध आहे, ज्याद्वारे नागरिक घरबसल्या नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
नागरिकांच्या सोयीसाठी लातूर तहसील कार्यालय येथे विशेष 'मतदार मदत कक्ष' स्थापन करण्यात आला आहे. मतदार यादीसंदर्भात काही अडचण किंवा शंका असल्यास नागरिकांनी या मदत कक्षाशी संपर्क साधावा. नोंदणी प्रक्रियेदरम्यान अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे व लातूर रहिवासाचे घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच, मागील ‘एसआयआर’मधील स्वतःची अथवा नातेवाईकांची मॅपिंग माहिती असल्यास ती नमूद करावी, अन्यथा इतर वैध कागदपत्रे सादर करण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल. तरी सर्व पात्र नवमतदार व नागरिकांना १० व ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिबीरांचा व ऑनलाईन सुविधांचा लाभ घेऊन मतदार यादीत नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग निश्चित करावा, असे उपविभागीय अधिकारी तथा २३५-लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या नोंदणी अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी करण्याचे आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा