दुष्काळी परिस्थितीला कंटाळून नांदुर्ग्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या
औसा तालुक्यातील घटना; विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू
औसा : तालुक्यातील नांदुर्गा येथील ५७ वर्षीय शेतकरी व्यंकट भाऊसाहेब शिंदे यांनी सततची नापिकी आणि पावसाअभावी सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान यामुळे आलेल्या नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे नांदुर्गा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. व्यंकट शिंदे यांनी दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. काही वेळानंतर घरात औषधाचा वास येत असल्याचे त्यांचा मुलगा मनोज यांच्या लक्षात आले. त्यांनी वडिलांच्या खोलीत जाऊन पाहिले असता शिंदे यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने वडिलांना उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
व्यंकट शिंदे यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार सात एकर शेती होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, सुना असा परिवार आहे. मागील काही वर्षांपासून शेतीत सातत्याने नापिकी होत होती. यंदाही पावसाअभावी सोयाबीनचे पीक हातचे गेल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. या परिस्थितीमुळे ते मागील काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. घरातही ते पूर्वीसारखे मनमोकळेपणाने वागत नव्हते, असे नातेवाईकांनी सांगितले.नापिकी, पावसाची अनिश्चितता आणि दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या चिंतेतूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे मुलगा मनोज व नातेवाईकांनी सांगितले. या घटनेने एका शेतकरी कुटुंबाचा आधार हरपला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
टिप्पणी पोस्ट करा