बोगी कारखान्यातील भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू - माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर

 बोगी कारखान्यातील भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू - माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर :केंद्र शासनाच्या वतीने लातूर येथे उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे फॅक्टरीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधींपासून डावलले जात असल्याचा आरोप करीत तरुणांच्या पुढाकारातून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाची माहिती मिळताच माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तरुणांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच अन्यायग्रस्त स्थानिक तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रभावीपणे पाठपुरावा करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी प्रतापराव शिंदे, तानाजी झुंजे पाटील, विरभद्र चिकटे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्षा सक्षणा सलगर, ठाकरे गटाचे धाराशिवचे कार्यकर्ते जगदीश पाटील, अमित हांडे पाटील, नागेश शिंदे, विलास मुळे, प्रविण साळुंके आदी उपस्थित होते.
मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्याचे भूमिपूजन 2018 मध्ये करण्यात आले होते. त्यावेळी स्थानिक एक लाख बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दरम्यान, या कारखान्याचे काम रशियन कंपनीकडे सोपविण्यात आले. संबंधित कंपनीसोबत झालेल्या कराराचा कालावधी 2027 पर्यंत असला, तरी सध्या या कारखान्यामध्ये सुमारे 450 कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी केवळ 150 कामगार स्थानिक आहेत. कारखान्यातील महत्त्वाच्या आणि वरिष्ठ पदांवर परराज्यातील कर्मचार्‍यांना संधी देण्यात आली असून, स्थानिक तरुणांना मात्र हाऊसकीपिंग, उद्यान देखभाल आणि सुरक्षा रक्षक अशा पदांवरच काम करण्याची संधी दिली जात असल्याची व्यथा आंदोलनकर्त्या तरुणांनी मांडली.
या संदर्भात आवाज उठविणार्‍या काही तरुणांना कारखान्याच्या सेवेतून कमी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याबाबत तरुणांनी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड तसेच कंपनीच्या अधिकार्‍यांकडे निवेदने देऊनही अद्याप न्याय मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन तरुणांच्या मागण्या जाणून घेतल्या. यामध्ये स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देणे, आयटीआय, पॉलिटेक्निक व अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, अन्यायकारक पद्धतीने सेवेतून कमी केलेल्या स्थानिक कामगारांना पुन्हा कामावर घेणे तसेच किनेट रेल्वे सोल्युशन लिमिटेड या कंपनीमध्ये स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देणे आदी मागण्यांचा समावेश आहे. या सर्व मागण्यांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

सकारात्मक चर्चेतून तरुणांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील!
मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यामध्ये काम करणार्‍या स्थानिक कर्मचार्‍यांना सेवेतून कमी करण्यात आल्यामुळे सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांसमोर अनेक आर्थिक व कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे न्याय्य हक्कांसाठी तरुणांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ.भारत बास्टेवाड व सोलापूरचे रेल्वे अधिकारी अनिरुद्ध पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून सकारात्मक चर्चा झाली व त्यांनी आंदोलन कर्त्यांशी संवाद घडवून आणला. त्यामुळे खर्‍या अर्थाने स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न हा मराठवाड्याच्या भविष्याशी निगडित असून, तो केवळ रोजगारापुरता मर्यादित नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी व शासन यांच्याशी समन्वय साधून सकारात्मक चर्चेतून या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू आणि स्थानिक तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा करू, असा ठाम विश्वास माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने