पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नागरिकांच्या तक्रारींवर थेट संवाद; १६ तक्रारदारांचे अर्ज स्वीकारले

पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नागरिकांच्या तक्रारींवर थेट संवाद; १६ तक्रारदारांचे अर्ज स्वीकारले
परभणी : नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी १९ नोव्हेंबर रोजी परभणी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील तक्रारदारांशी थेट संवाद साधला. यावेळी एकूण १६ तक्रारदारांनी त्यांच्याकडे लेखी अर्ज सादर केले.
नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांमध्ये पोलीस-जनता संबंध अधिक दृढ करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पुढाकारातून 'जनसंवाद' उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकाभिमुख पद्धतीने कामकाज करण्यावर भर दिला जात आहे.
परभणी जिल्ह्याच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे गुरुवारी सकाळपासून पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित होते. यावेळी दुपारी ३ ते ४.३० या वेळेत त्यांनी जिल्ह्यातील तक्रारदारांशी संवाद साधला. या संवादादरम्यान मालमत्ताविषयक वाद, मारहाण, दाखल गुन्ह्यांचा तपास, अवैध व्यवसाय आदी विविध विषयांशी संबंधित तक्रारी मांडण्यात आल्या.
प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत त्यांच्या तातडीने निपटाऱ्यासाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच तक्रारदारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले.
तक्रारदारांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांचा वेळेत निपटारा व्हावा, यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयामार्फत यापूर्वीच 'संवेदना' ही तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली आहे. 'जनसंवाद' उपक्रमादरम्यान प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची 'संवेदना' पोर्टलच्या माध्यमातून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्गवारी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक टीममार्फत घेतला जाणार आहे.याप्रसंगी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने