यावर्षी 15 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे झाले असून त्यानिमित्त आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (आजादी का अमृत महोत्सव) साजरा करत आहोत. “तिरंगा” आपल्या देशाचा अभिमान आणि सन्मान आहे. आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे आणि प्रेरणेचे प्रतीक आहे. तसेच तिरंगा ध्वज हा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करुन देतो.
आपल्या राष्ट्रध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” (आजादी का अमृत महोत्सव) अंतर्गत “घरोघरी तिरंगा” (हर घर तिरंगा) ही मोहिम शासनामार्फत राबविण्यात आली. या मोहिमेचा उद्देश प्रत्येक भारतीय नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकविण्याची प्रेरणा देणे हा आहे. लोकांच्या ऱ्हदयात देशभक्ती जागृत करणे, आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
“घरोघरी तिरंगा” या मोहिमे अंतर्गत ध्वजारोहण हे सर्व निवासस्थान, शासकीय, निमशासकीय कार्यालये, औद्योगिक संस्था, शाळा, विद्यालये आदी ठिकाणी तर मोठ्या उत्साहात केल्याचे चित्र आज सर्वत्र पहावयास मिळाले. संपूर्ण भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक राज्यातील शासकीय कार्यालये, ऐतिहासिक वास्तू, धरणे, गड-किल्ले आदींवरील आकर्षक अशा नेत्रदिपक विद्युत रोषनाईने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर देखील स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे अभियान राबविण्यास ग्रामीण रहिवासी कुठेच मागे नसल्याचे चित्र आज संपूर्ण देशात दिसून आले. वाड्या-वस्त्यांवर तसेच पालांवर राहणाऱ्या नागरिकांमध्ये देखील “घरोघरी तिरंगा” या अभियानाने जणू नवी स्फूर्ती निर्माण झालेली दिसत होती. ग्रामीण भागामध्ये दिवाळीचा सण हा जसा पहाटे लवकर उठून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो, अगदी त्याचप्रमाणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आज ग्रामीण भागातील नागरिक सकाळी लवकर उठून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा जणू सणच साजरा करताना पहावयास मिळाले. एक वेगळाच उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. प्रत्येक जण ओढा-चढीने आप-आपल्या घरावर तिरंगा फडकवून हर घर तिरंगा या अभियानाचा एक हिस्सा होऊ पाहत होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने का होईना आज सर्वत्र एक प्रकारचे देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रत्येकाच्या व्हॉटस्अप स्टेटस वर देखील देशभक्तीपर स्टेटस् पहावयास मिळाले. नाहीतर इतर दिवशी बऱ्याच नागरिकांच्या व्हॉटस्अप स्टेटसला चित्रपटांची गाणी पहावयास मिळतात. आज प्रत्येकजण देशभक्तीत तल्लीन झालेला होता. यावरुन “घरोघरी तिरंगा” हे अभियान खऱ्या अर्थाने “हर मन तिरंगा” असे झाल्याचे चित्र आज सर्वत्र दिसून येत होते.
- श्रीकांत चंद्रकांत देशमुख
जिल्हा माहिती कार्यालय,
उस्मानाबाद

टिप्पणी पोस्ट करा