करियर घडविताना प्रयत्न आवश्यक-प्रा चंद्रकला भार्गव

                        करियर घडविताना प्रयत्न आवश्यक-प्रा चंद्रकला भार्गव 

औसा-विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक करिअर घडवीत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये असणारी आपली क्षमता त्या क्षेत्रातील आवड आणि पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या प्रा चंद्रकला भार्गव यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघ औसा आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. केदारनाथ मंगल कार्यालय औसा येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर जिल्हा बँकेचे संचालक अशोक गोविंद पुरकर, मायाताई कुलकर्णी, शकुंतला यादव, संघटनेचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ कोरे, आणि वीरभद्र कल्याणी, यांची उपस्थिती होती. इयत्ता दहावी आणि बारावी वर्गामध्ये उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यासह समाजात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचाही मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पुढे बोलताना प्रा चंद्रकला भार्गव म्हणाल्या की माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचा घरामध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे.  विद्यार्थी वर्गामध्ये शारीरिक बदल घडत असतात त्या मुळे होणारे बदल स्वीकारून कुटुंबात सुसंवाद साधल्यास विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यास मदत होते. 10 वी आणि 12 वीचे यश म्हणजे अंतिम यश नसून येथूनच आपले उज्वल भवितव्य घडविण्याची सुरुवात होत असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश संपादन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नाची कास धरणे आवश्यक असेही त्यांनी स्पष्ट केले. औसा तालुक्यातील 42  गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष आर के शिंदे, सुरेश स्वामी, एस एस शिंदे, ज्ञानोबा काळे, दादा कोपरे,संभाजी शिंदे, नारायण जाधव, सुरेश कल्याणी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी प्रयत्नशील होते. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ कोरे यांनी केले या प्रसंगी अशोक गोविंद पुरकर, डॉ मायाताई कुलकर्णी, यांचेही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज हलकुडे यांनी तर आभार प्रदर्शन बी.आर. पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी पालक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने