केशवराजमध्ये राष्ट्रीय स्फूर्तीगीत गायन कार्यक्रम
लातूर /प्रतिनिधी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय स्फूर्तीगीते गायनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वसमतकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी डॉ.अभिषेक बादाडे यांची उपस्थिती होती. तसेच पर्यवेक्षक संदीप देशमुख,बबन गायकवाड यांचीही यावेळी मंचावर उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरूवात भारत मातेच्या पूजनाने झाली.यावेळी 'वाटेवर अमरत्वाच्या ठेवीत ठसा पायांचा,चालला सूर्य डौलाने भारतीय स्वातंत्र्याचा,'बलसागर भारत होवो' 'वेडात मराठे वीर दौडले सात', जयोस्तुते ही राष्ट्रीय स्फुर्तीगीते सादर करण्यात आली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ.अभिषेक बादाडे म्हणाले,की भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे भाग्य आपणास लाभले आहे,ही फार मोठी गोष्ट आहे.कोणत्याही प्रकारे आपण देशाची सेवा केली पाहिजे.अगदी लहान-लहान गोष्टीतून आपणास देशसेवा करता येते.पाण्याचा अपव्यय टाळून पाण्याची बचत करणे, अयोग्य ठिकाणी कचरा न टाकणे हीदेखील देशसेवाच आहे असे सांगून बादाडे यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही भरपूर शिका,भरपूर खेळा,आनंदी रहा, अभ्यास करा व शाळेला विसरू नका,असा मौलिक सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन सौ.स्मिता मेहकरकर यांनी केले.प्रास्ताविक,परिचय व स्वागत अभ्यासपूरक मंडळ प्रमुख शैलजा देशमुख यांनी केले. जान्हवी देशमुख यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे,पर्यवेक्षक संदीप देशमुख, बबन गायकवाड,संगीत शिक्षक संतोष बीडकर व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा