श्री गणरायाचे उद्या जल्लोषात आगमन शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम : गणेशभक्त स्वागतास सज्ज

 


श्री
गणरायाचे उद्या जल्लोषात आगमन

शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम : गणेशभक्त स्वागतास सज्ज

 

औसा :(प्रतिनिधी) : तब्बल दोन वर्षाच्या खंडानंतर यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव गणेश भक्तांच्या अभूतपूर्व उत्साहासह जल्लोषात साजरा होणार आहे.
कोरोनाच्या आपत्तीने, निर्बंधामुळे तब्बल दोन वर्ष गणेशोत्सवावर मोठ्या प्रमाणावर निरुत्साहाचे सावट पसरले होते. विशेषतः गणेश भक्तांना साधेपणाने, सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करीत गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. संख्येची मर्यादाच मोठी जाचक अट ठरली होती. परंतु, आपत्तीचे भान ओळखून गणेशभक्तांनीसुध्दा सामाजिक बांधिलकीपोटी सर्व नियम, संकेतांचे काटेकोरपणे पालन केले मर्यादेतच गणेशोत्सव साजरा केला.यावर्षी कोरोनाचे सर्व वातावरण निवळल्याच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात, जल्लोषात, उत्साहात साजरा होईल, असे स्पष्ट संकेत आहेत. कारण गेल्या आठ-पंधरा दिवसांपासून गणेशभक्तांनी, सार्वजनिक गणेश मंडळांनी कार्यकारिणीची निवड, गणेशोत्सवाच्या काळातील कार्यक्रमांचे नियोजन, पाहुणे, महाप्रसाद वगैरे सर्व गोष्टींचे भक्कम असे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने तयारी केली आहे. यावर्षी गणेश भक्तांचा जल्लोष अभूतपूर्वच राहील, हे ओळखून मूर्तीकारांनीसुध्दा बाजारपेठांमधून एकासरसएक छोट्या-मोठ्या आकारांच्या श्रींच्या मूर्त्या विक्रीस आणल्या आहेत. महागाईच्या पार्श्वभूमीवर या मूर्त्यांच्या किंमती निश्चितच महागल्या आहेत. परंतु, गणेशभक्तांचा उत्साह, जल्लोष वगैरे गोष्टी मूर्ती खरेदीसह गणेशोत्सवातील कार्यक्रमांच्या दृष्टीने अडचणीच्या ठरणार नाहीत, असे चित्र आहे.

परभणी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमधून छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी चार दिवसांपासून स्टॉल्स थाटले आहेत. पनवेल, पूर्णा वगैरे भागातून गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत. रंगी-बेरंगी, वेगवेगळे हावभाव रुपातील तसेच विविध आकाराच्या या मूर्त्या गणेशभक्तांकरीता आकर्षण ठरल्या आहेत.गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येस म्हणजे मंगळवारी (दि.30) बाजारपेठांमधून गणेशभक्तांनी सहकुटूंब हजेरी लावून श्रींच्या मूर्त्यांची बुकींग केली. काहींनी मूर्त्याही खरेदी केल्या. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत अभूतपूर्व उत्साह आनंदाचे वातावरण पसरले होते. मूर्त्यांव्यकतरिक्त पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य वगैरे गोष्टींच्या खरेदीकरीताही गणेशभक्तांची लगबग सुरु होती.

मध्यवस्तीसह चोहोबाजूंच्या वसाहतीतील गणेश मंडळांनी या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी जागा निश्चित करीत, मंडप उभारणी करीत सुंदर अशी सजावट करीत श्री गणरायाच्या आगमनाची पूर्ण तयारी केली आहे. काही मंडळांनी गणेश मूर्तीही निश्चित केल्या. बुधवारी सकाळपासून सायंकाळी उशीरापर्यंत या मंडळाद्वारे त्या त्या ठिकाणांहून गणेशमूर्ती वाजत गाजत गणरायाचा जयघोष करीत मंडळांच्या ठिकाणी मिरवणूकीद्वारे नेल्या जातील. संपूर्ण धार्मिक विधींसह श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. त्या दृष्टीने मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते कामात दंग होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने