औसा शिक्षक पतसंस्थेची सहकारी बँक रुपांतराकडे वाटचाल – आ. अभिमन्यु पवार


 औसा शिक्षक पतसंस्थेची सहकारी बँक रुपांतराकडे वाटचाल – आ. अभिमन्यु पवार



औसा : शिक्षकांचा व पतसंस्थेचा सर्वागीण विकास करत औसा शिक्षक पतसंस्थेची सहकारी बँक रुपांतराकडे वाटचाल सुरु असल्याचे मत औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या शिक्षक भवन सभागृहात आयोजित ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केले.सभेच्या अध्यक्षस्थानी थोर विचारवंत माजी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार हे होते तर व्यासपीठावर भाजपा लातूर जिल्हा प्रभारी संतोष आप्पा मुक्ता, भाजपा औसा तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, माजी पं.स.सदस्य दौलत वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथीच्या शुभहस्ते सेवानिवृत्त शिक्षक सभासदांचा, गुणवंत सभासद पाल्याचा व संस्थामित्र शिक्षक सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अभिमन्यू पवार पुढे बोलताना म्हणाले की, शिक्षकांनी एकत्र येत पतसंस्था उभारणे, सहकाराचे तत्व अंगीकारून ती ४-५ दशके टिकवणे, एकमेकांना साहाय्य करून आर्थिक प्रगती साधने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सभासदांना १०% प्रमाणे कर्ज वाटप करीत १०% व्याजदराची ठेव, आरडी योजना/ कर्ज जीवन हमी योजना/ शिक्षकांसाठी ग्रंथालय सुरु करणे इत्यादी अभिनव उपक्रम राबविणे कौतुकास्पद असून शिक्षकांचा व पतसंस्थेचा सर्वागीण विकास करणारी औसा शिक्षक पतसंस्था असल्याचे सांगून औसा शिक्षक पतसंस्थेची सहकारी बँक रुपांतराकडे वाटचाल सुरु असून पतसंस्थेचे बँकेत रूपांतरण करण्यासाठी लागेल ते सहकार्य करिन अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी दिली. खरे पाहता चालक व्यवस्थित असेल तरच सर्व गोष्टी व्यवस्थित होतात म्हणून औसा शिक्षक पतसंस्थेचे चालक चेअरमन हे योग्य कार्यकुशल, दूरदृष्टी विचाराचे असल्याचे गौरव उद्गार काढून सर्व संचालक मंडळाचे यावेळी त्यांनी अभिनंदन केले.
    संस्थेचे चेअरमन महादेव खिचडे यांनी आपल्या प्रास्ताविकात पतसंस्थेच्या ठेव, आर.डी., शेअर्स, कर्ज जीवन हमी योजनाची सविस्तर माहिती देवून सभासदांना यावर्षी पण सर्वाधिक १०.५०% लाभांश आणि दि. ०१-०१-२०२३ पासून ९.५०% कर्जाचा व्याजदर राहील असे यावेळी जाहीर केले. संस्था स्वावलंबी होण्यासाठी यापुढेही सर्व सभासदांनी संस्थेच्या योजनेत सहकार्य करावे असे आवाहन यावेळी सर्व सभासदांना केले. तसेच तालुक्यातील शिक्षकांचे गेल्या २ वर्षापासून निधी उपलब्ध नसल्याने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण झाला नाही, बाला उपक्रमा अंतर्गत उत्का अ शाळेत जाहीर केलेला दरवर्षीचा २५ लाख रु. निधी शाळेला मिळाला नाही, शालार्थ प्रणालीमध्ये पतसंस्था कपात हे नवीन टब समाविष्ठ करणे, सहकारी पतसंस्थावर अंशदान योजनाची अंमलबजावणी थांबविणे आदी मागण्या आमदार साहेबाकडे यावेळी मांडल्या. यावर आमदार साहेबांनी यावर्षी २ वर्षाचे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम निधी उपलब्ध नसेल तर माझ्या स्वखर्चातून घेण्यात येईल असे जाहीर करून बाकीच्या मागण्या संदर्भात मी शिक्षण मंत्री, सहकार मंत्री यांच्याशी चर्चा करून याबाबत मी विधानसभेत विषय मांडण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
  सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे व्हा. चेअरमन हरीश आयतनबोने, संचालक दत्तात्रय दंड्गुले यांनी केले. दुसऱ्या सत्रात विषय पत्रिकेतील विषयाचे वाचन व आभार संस्थेचे सचिव संजय जगताप यांनी केले. वार्षिक सभेत सभासदांनी विचारलेल्या लेखी, तोंडी प्रश्नांबाबत सभासद व संचालक मंडळ यांच्यात खेळीमेळीच्या वातारणात चर्चा झाली. शेवटी राष्ट्रगीत घेवून उपस्थित सर्व सभासद व संचालक मंडळानी चहा घेवून सभेची सांगता करण्यात आली. या सभेस सर्व संचालक मंडळासह ४५० शिक्षक सभासद सहभागी होते. या वार्षिक सभेच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक दिपक डोंगरे, युसुफ पिरजादे, गोवर्धन चपडे, संजय रोडगे, सोमनाथ कांबळे, मधुकर गोरे संचालिका मीराताई कुलकर्णी, उर्मिलाताई सोनटक्के व पतसंस्थेचे कर्मचारी मल्हारी कांबळे, शिरीष पवार, विनय आयतनबोने यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने