मनपाने मालमत्ता कर आकारणी फेर सर्वेक्षण निविदा रद्द करावी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे

मनपाने मालमत्ता कर आकारणी फेर सर्वेक्षण निविदा रद्द करावी
 माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे 



लातूर -शहर महानगरपालिका प्रशासनाने नुकतेच लातूर शहरातील सर्वच मालमत्तांचे फेर सर्वेक्षण करण्याकरिता निविदा प्रकाशित केली आहे. याद्वारे लातूर शहरातील सर्व निवासी तथा वाणिज्य इमारती व खुल्या भूखंडाचे फेर सर्वेक्षण करून कर आकारणी नव्याने केली जाणार आहे. लातूर मनपाने यापूर्वी सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करून कर आकारणी केलेली असताना आता नव्याने फेर सर्वेक्षण कशाकरिता आवश्यक आहे, असा प्रश्न उपस्थित करत असे फेर सर्वेक्षण झाल्यास शहरातील नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागेल आणि मनपाच्या तिजोरीवर सुमारे ६ कोटीचा बोजा पडेल, त्यामुळे मालमत्तांची कर आकारणी फेर सर्वेक्षण निविदा तात्काळ रद्द करावी अशी सूचना लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मनपा प्रशासनास केली आहे.

लातूर शहर महानगरपालिकेने सन २०१६ साली शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण व कर आकारणी करण्याकरिता खाजगी कंत्राटदाराची नेमणूक केली होती, त्या माध्यमातून शहरातील निवासी तथा वाणिज्य इमारती व खुले भूखंड अशा सुमारे १ लक्ष मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्या मालमत्तांना कराची आकारणी करण्यात आली होती. त्यामध्ये प्रत्येक मालमत्तेचे गुगल इमेज, प्रत्यक्ष फोटो, बाहेरील व अंतर्गत मोजमाप घेणे, झोनिंग करणे, मालमत्तांना क्रमांक देणे, नकाशे बनविणे, व कर आकारणी करून यासर्वांचे संगणकीकरण करणे अशा बाबींचा समावेश होता. मागील पाच वर्षात या कामावर मनपाचा सुमारे ६ कोटीचा खर्च आजवर झालेला आहे. तसेच चालू वर्षातील जानेवारी महिन्यापर्यंत आढळून आलेल्या नवामालमत्तांचेही सर्वेक्षण व कर आकारणी वेळोवेळी करण्यात आलेली आहे. मागील काळात याबाबत नागरिकांनी वेळोवेळी आक्षेपही नोंदविले होते व न्यायालयीन प्रकरणेही दाखल झालेली होती. याबाबत नागरिकांद्वारे आणि विविध पक्ष, संघटना यांच्यावतीने आंदोलने ही वेळोवेळी करण्यात आली होती. अक्षेपांवरील सुनावणी व कर आकारणी मधील दुरुस्ती या किचकट प्रक्रिया पार पाडण्याकरिता मागील पाच वर्षाचा काळ आणि मनपाचे मनुष्यबळ खर्ची पडले आहे.  विशेष म्हणजे  मागील वर्षभरापासून एचडीएफसी बँकेच्या सीएसआर मधून कर देयक बनवणे, आकारणी करणे, संगणकीकरण करणे अशी कामे मोफत केली जात आहेत. याकरिताचे आवश्यक सॉफ्टवेअर देखील मनापासून उपलब्ध आहे

अशा परिस्थितीतही मनपा प्रशासनाने नुकतीच शहरातील सर्वच्या सर्व मालमत्तांचे कर आकरणी व फेर सर्वेक्षण करण्याकरिता निविदा प्रकाशित केलेली आहे. यापूर्वीच केले गेलेल्या कामावर पुन्हा नव्याने सुमारे ६ कोटी रुपये मनपाच्या तिजोरीतून खर्च होणार असून यामुळे सामान्य लातूरकरांना नाहक त्रास सोसावा लागणार लागेल आणि केवळ कंत्राटदाराचे हित साधले जाण्याची शक्यता माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केली. मागील दोन वर्षाच्या कोविड संकटानंतर सामान्य लातूरकर स्वतःच्या पायावर उभे राहत असताना अशा अनावश्यक बाबींमुळे नागरिकांना विनाकारण त्रासात सामोरे जाऊन नागरिक भरडले जाणार आहेत. तसेच लातूरकरांवर मालमत्ता कराचा बोजा देखील वाढला जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे लातूर शहर मनपा प्रशासनाने शहरातील मालमत्तांची कर आकारणी फेर सर्वेक्षण निविदा तात्काळ रद्द करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी सूचना लातूर मनपा प्रशासनास माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने