स्मरण मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे (भाग एक )

स्मरण मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे

 (भाग एक )



मराठवाडा स्वातंत्र्य होऊन 17 सप्टेंबर रोजी 74 वर्षे पूर्ण होऊन 75 वर्षात प्रवेश करेल.. त्यानिमित्ताने मराठवाडा काय होता.. इथे निजामशाही कशी आली.. त्या निजामशाहीच्या काळात काय परिस्थिती होती. त्या हुकूमशाही विरोधात जो लढा उभा राहिला तो कसा उभा राहिला आणि अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी हा भाग निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झाला. त्या संदर्भातील माहिती काही भागात प्रसारीत करत आहोत.

          सम्राट अशोकाच्या 16 महाजनपदा पैकी दोन महाजनपदे एक अश्मक  आणि दुसरे मूलक हे गोदावरीच्या खोऱ्यात नांदणारी.. हे दोन्ही महाजनपदात बहुतांश लोकं महाराष्ट्री प्राकृत बोलणारी.. सातवाहन राजा हाल यांनी 700 काव्य एकत्र करून संपादित केलेला " गायासप्तशती " म्हणजेच गाथा सप्तशती ही प्राकृत मधून असलेली निर्मिती... यात या गोदावरी खोऱ्यातील लोकांचे लोक जीवन प्रतिबिंबीत झाले आहे. यातून एकच ध्वनीत होते की हा प्रदेश म्हणजे मराठीचे आद्य रूप महाराष्ट्री प्राकृत बोलणारा प्रदेश... पुढे अनेकांनी या प्रदेशावर आपली हुकूमत गाजवली आणि 1724 मध्ये दिल्लीची सुभेदार निजाम उल मुल्क या निजामशहाने हैद्राबाद मध्ये निजामशाही स्थापन केली. यात तीन भाषा बोलणारे प्रदेश होते.. एक तेलगू ( आंध्र ), कन्नड ( कर्नाटक ) आणि मराठी ( मराठवाडा ).. यात  लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा मराठी बोलणाऱ्या लोकांचा शेवटचा भाग.. म्हणजे निजामाच्या काळात भाषे प्रमाणे प्रदेशाची नावे झाली आणि मराठी बोलणाऱ्या लोकांचा मराठवाडा हे नाव कायम झाले.


निजाम आणि मराठ्यांच्या चकमकी

अहमदनगरच्या निजामाच्या पाडावानंतर दक्षिणेत आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन सम्राज्यांनी मुघलांचे मांडलिकत्व पत्करले. 3 मार्च 1707 औरंगजेबचा मृत्यू झाला आणि 12 जानेवारी 1708  साली साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्यावर मराठेशाहीचा पुन्हा झेंडा फडकला आणि छत्रपती शाहू महाराज गादीवर आले. मराठ्यांचा राज्य विस्तार झपाट्याने झाला. धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, दादो मल्हार, संभाजी निंबाळकर हे सरदार मराठ्यांच्या मोहिमेचे नेतृत्व करत होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलशाही कुमकुवत झाली. या दोन्ही शाह्या त्यांच्या मुघलांच्या मांडलिकत्वाखाली होत्या. वेळोवेळी निजाम आणि मराठयात तह होत गेले.. अनेक सुभ्यात मोठा महसूली हिस्सा मराठ्यांना मिळत होता. 27 डिसेंबर 1732 रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या साम्राज्याचे पेशवे बाजीराव व चिम्माजी आप्पा आणि निजाम यांची लातूर पासून आठ मैलावर मांजरा नदीच्या काठी असलेल्या रुई - रामेश्वर येथे ऐतिहासिक भेट झाली.

 

27 डिसेंबर 1732 रोजी बाजीराव पेशवे व चिम्माजी आप्पा आणि निजाम यांची लातूर पासून आठ मैलावर मांजरा नदीच्या काठी असलेल्या रुई - रामेश्वर येथे ऐतिहासिक भेट झाली. त्यामागची पार्श्वभूमी समजून घेणे महत्वाचे आहे. त्याशिवाय रुई - रामेश्वर भेटीचे महत्व अधोरेखित होणार नाही.

          जंजिरा येथे सिद्दी आणि पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवर मराठा वर्चस्वाला आव्हान दिले. पण बाजीरावांच्या शत्रूंमध्ये सर्वात आघाडीवर होता निजाम उल मुल्क, दख्खनचा मुघल व्हाईसरॉय (हैदराबादचा). त्याला मुघल सम्राटांचे कमकुवत नियंत्रण देखील जाणवले आणि त्याला दख्खनमध्ये स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे होते. निजाम उल मुल्कने मुघल-मराठा करार आणि दख्खनमध्ये चौथ गोळा करण्याच्या मराठ्यांच्या अधिकाराकडे दुर्लक्ष केले. दिल्ली दरबाराने मुघल-मराठा कराराची पुष्टी करूनही या प्रकरणाचा (1721 चा चिकलठाण चर्चा) शांततापूर्ण तोडगा काढण्याचे प्रारंभिक प्रयत्न अयशस्वी ठरले. कमकुवत दिल्ली दरबारही संदिग्ध धोरण खेळत होता. एकीकडे याने दख्खनमधील मराठ्यांचा चौथ संकलनाचा अधिकार मान्य केला, पण दुसरीकडे, निजाम उल मुल्कचे दख्खनमधील स्थान केवळ दख्खनमध्येच नव्हे तर गुजरातमध्येही वाढवून मजबूत केले.

          मुघलांच्या प्रभावाला आता ग्रहण लागले होते. परंतु 1722 मध्ये, मुघल सम्राट मुहम्मद शाह 'रंगीला' याच्यासमोर निजाम उल मुल्कच्या प्रादेशिक महत्त्वाकांक्षा उघड झाल्या आणि त्याला बाजूला केले जाऊ लागले. निजाम उल मुल्कने आता मुघल सम्राटाविरुद्ध उघडपणे बंड केले आणि त्याच्या प्रदेशांना हैदराबादची राजधानी असलेले स्वतंत्र राज्य घोषित केले. जेव्हा मुबारीझ खानच्या नेतृत्वाखालील शाही सैन्याने निजामाला ताब्यात घेण्यासाठी दख्खनच्या दिशेने कूच केले, तेव्हा त्यांनी आपल्या जुन्या शत्रूंकडे, म्हणजे मराठ्यांकडे मदत मागितली.


साखरखेर्डायाची लढाई मराठ्यांच्या उदयाची

           बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा नावाचे गाव आहे. आज हे गाव विस्मरणात गेले असले तरी इ.स.1724 साली इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्वाची घटना या गावात घडली आहे. इतिहासात हि घटना साखरखेर्ड्याची लढाई म्हणुन प्रसिध्द आहे. या लढाईमुळे मुघलांचे दक्षिणेतील वर्चस्व कायमचे संपले आणि मराठे व निजाम या दोन प्रबळ सत्ता म्हणून उदयास आल्या. छत्रपती शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांना निजामाला मदत करण्यासाठी तुकडी पाठवण्याची सूचना केली. त्यांच्या सामूहिक सैन्याने 1724 मध्ये साखरखेर्डा येथे शाही सैन्याचा पराभव केला. परंतु, त्याच्या स्वभावाप्रमाणे, धोका टळलेला पाहून निजाम उल मुल्कने 1718 च्या मुघल-मराठा कराराचा सन्मान करण्यास नकार देऊन पुन्हा मराठ्यांना आव्हान दिले. मीठ चोळण्यासाठी निजाम उल मुल्कने कोल्हापुरचे छत्रपती संभाजी दुसरे , चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण आणि राव रंभा निंबाळकर यांचा छत्रपती शाहूंच्या विरोधात युती केली. 1727 मध्ये पेशवे आणि त्यांचे सैन्य चौथ गोळा करण्यासाठी गेले तेव्हा निजामाच्या सैन्याने त्यांना आव्हान दिले. मराठ्यांनी निजामाच्या सैन्याला वश करण्यात यश मिळवले आणि प्रत्युत्तरादाखल जालना, बुर्‍हाणपूर आणि खानदेश देखील लुटले.

 

 क्रमशः

 

जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने