रेणुका देवी मंदिराच्या सुविधेसाठी शासनाकडे सर्वतोपरी पाठपुरावा करू- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 रेणुका देवी मंदिराच्या सुविधेसाठी शासनाकडे सर्वतोपरी पाठपुरावा करू- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर


लातूर -राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या रेणुका देवी मंदिराच्या विकासासाठी तत्कालीन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा पाटील कव्हेकर यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 20 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता. यामुळे मंदिर परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी मंदिरासाठी सर्वतोपरी मदत केल्यामुळे या मंदिराला ब दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे यापुढील कालावधीतही मंदिराच्या पश्‍चिम गेट व भक्‍त निवासाच्या विकासासाठी शासनाकडे सर्वतोपरी पाठपुरावा करू असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते रेणापूर येथील रेणुकादेवी मंदिर समितीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी रेणुका देवी मंदिर समितीचे अध्यक्ष राम पाटील, संचालक बापू गिरी, अ‍ॅड.प्रशांत आकणगिरे यांच्यासह रेणापूर पंचायत समितीचे माजी सदस्य अप्पासाहेब पाटील, जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, शिवाजी गाडे, एम.एन.एस.बँकेचे संचालक सूभाषअप्पा सुलगुडले, दिलीप पाटील, जननायक संघटनेचे रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, अ‍ॅड. देविदास कातळे, विजयकुमार एकुर्गे, सूरेश सौदागर, दूर्गादास राजे, धनंजय म्हेत्रे, विकी पाटील, सुनिल मुसळे, चेतन एकूर्गे, प्राचार्य आर.एस.अवस्थी, उपप्राचार्य मारूती सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रकाश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, रेणुका देवी मंदिराचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तरीही राज्यातून येणार्‍या भाविकांची संख्या लक्षात घेवून भव्य दिव्य भक्‍त निवासाची उभारणी करणे गरजेचे आहे. तसेच यासाठी इतर मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे. त्यासाठी मंदिर समिती व नगरपंचायतीने याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. याचा पाठपुरावा करून रेणुका देवी मंदिराच्या चौफेर विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू असा विश्‍वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केला.
प्रारंभी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी रेणुका देवीची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. यावेळी रेणुका देवी मंदिर समितीच्यावतीने अध्यक्ष राम पाटील यांच्याहस्ते भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला.  
भाविकांसाठी नेहरू नगर ते शिवाजी महाविद्यालयाचापर्यंतचा रस्त्याची सोय व्हावी
नवरात्र उत्सवानिमित्त रेणुका देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे. काही भाविक पायी चालत जावून रेणुका देवीचे दर्शन घेतात. परंतु नेहरू नगर-राजेवाडी ते शिवाजी महाविद्यालयापर्यंतचा रस्ता खराब झालेला आहे. यामुळे भाविकांना पायी दर्शनासाठी जाणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी नेहरू नगर ते शिवाजी महाविद्यालयापर्यंतचा रस्त्यासाठी आपण पाठपुरावा करावा अशी मागणी रेणुका देवी मंदिर समितीचे अध्यक्ष राम पाटील यांनी करताच याबाबतचा प्रस्ताव सादर करा यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू असे आश्‍वासनही माजी आ.कव्हेकरांनी यावेळी बोलताना दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने