गणेशोत्सवानिमित्त केशवराजमध्ये वादविवाद स्पर्धा संपन्न
लातूर /प्रतिनिधी:येथील श्री केशवराज माध्यमिक विद्यालयात केशवराज माजी विद्यार्थी संघ आणि केशवराज माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त वादविवाद स्पर्धा संपन्न झाली. 'गणेशोत्सवाचे बदललेले स्वरूप योग्य आहे/नाही' या विषयावर संपन्न झालेल्या या स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावी विभागातील २१ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉ.रमणी बोरगावकर या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक संदीप देशमुख, तसेच पर्यवेक्षक बबन गायकवाड, अभ्यास पूरक मंडळ प्रमुख श्रीमती शैलजा देशमुख, ज्ञानोपासक मंडळ प्रमुख श्रीमती क्षमा कुलकर्णी,स्पर्धा परीक्षक प्रदीप कटके व नरेश इरलापले यांचीही यावेळी मंचावर उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ.रमणी बोरगावकर म्हणाल्या,शिक्षण हे माणसाला माणूस म्हणून जीवन जगायला शिकवते तर छंद हे माणसाला आनंदी जीवन जगायला शिकवतात.यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असणारे छंद जोपासले पाहिजेत असे मत डॉ. रमणी बोरगावकर यांनी यावेळी व्यक्त केले. डॉ.बोरगावकर यांनी वक्तृत्व कलेचे महत्त्व सांगून शालेय जीवनातील अनेक अनुभव, प्रसंग, आठवणींना याप्रसंगी उजाळा दिला.
या स्पर्धेचा समारोप पर्यवेक्षक बबन गायकवाड यांनी केला. त्यात त्यांनी वादविवाद स्पर्धा म्हणजे काय असते ते सांगून स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांनी वर्तमानातील अनेक उदाहरणे देऊन आपला विषय ठासून मांडावा.विषय मांडत असताना त्यात मार्मिकता असावी.
बोलण्यात म्हणी,वाक्प्रचार यांचा वापर करावा असे सांगितले.
मुख्याध्यापक सुनील वसमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेल्या या स्पर्धेचे प्रास्ताविक ज्ञानोपासक मंडळ प्रमुख क्षमा कुलकर्णी यांनी केले. तर स्पर्धा प्रमुख श्रीमती वनमाला कलुरे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुमेधा बिरादार व कु.अनुष्का तिडके या विद्यार्थिनींनी केले. कु.गार्गी पाटील या विद्यार्थिनीच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, गणेशोत्सव प्रमुख सारिका चद्दे, टेक्निकल विभागातील शिक्षक किशोर सुरवसे, ज्ञानोपासक मंडळातील सर्व शिक्षक,शिक्षिका, सेवक गुरूदत्त कस्तुरे, विजय कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा