भाडेवाढ करणाऱ्या वाहनधारकांवर ग्राहक संरक्षण कायद्यान्वये कारवाई करावी - ग्राहक पंचायत लातूर
लातूर/प्रतिनिधी: दीपावलीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी पाहून बेसुमार भाडेवाढ करणाऱ्या वाहन धारकांवर ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अन्वये कायदेशीर कार्यवाही करावी,अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले पाटील व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
दीपावली हा सर्वात मोठा सण असून यानिमित्त शहरात राहणारे अनेकजण मूळ गावी परततात. लेकी माहेरला जातात. नातेवाईकांना भेटण्यासाठी अनेकजण प्रवास करतात. त्यामुळे सहाजिकच प्रवाशांची गर्दी होते.बस आणि रेल्वेमध्ये जागा उपलब्ध होत नाही.यामुळे अनेक प्रवासी खाजगी वाहनांचा आधार घेतात.ही संधी ओळखून खाजगी ट्रॅव्हल्स आणि इतर वाहनधारकांकडून दुपटीने भाडे वसूल केले जाते.यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
ही लूट थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी,क्षेत्रीय परिवहन अधिकारी,पोलीस आणि ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची तालुकानिहाय पथके तयार करावीत.प्रवाशांच्या बुकिंगसाठी थाटलेली कार्यालये व वाहनांची अचानक तपासणी करावी.यामुळे प्रवाशांच्या लुटीला आळा बसेल. बेकायदा होणारी प्रवासी वाहतूक थांबेल,अपघातांची संख्या कमी होईल.अशा प्रकारात दोषी आढळणाऱ्या वाहनधारक आणि संबंधितावर ग्राहक संरक्षण कायद्यान्वये कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले पाटील,सचिव माधव गुंडरे,बालाजी पिंपळे,
ॲड.संगमेश्वर रासुरे,धनराज जाधव,इस्माईल शेख यांच्या साक्षऱ्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा