हिप्परसोगा येथून शेतकरी संघटनेच्या युवा संपर्क अभियानास प्रारंभ
लातूर/प्रतिनिधी: संपूर्ण कर्जमुक्ती,वीजबिल मुक्ती तसेच बाजारपेठ व तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्यासाठी व्यापक लढा उभारण्याच्या हेतूने शेतकरी संघटनेच्या वतीने युवा संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथून या अभियानास प्रारंभ झाला.
ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नामुळे जगणे कठीण झाले आहे.सरकारचे शेतकरी धोरण हे विविध प्रश्नांचे कारण असल्याचे शरद जोशी यांनी म्हटलेले आहे. त्यांच्या विचारातूनच शेतकरी आणि देशातील विविध प्रश्न सुटणार आहेत.हे विचार नव्या पिढीला समजावेत,त्यातून व्यापक लढा निर्माण व्हावा यासाठी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या वतीने युवा संपर्क अभियान राबविले जात आहे.
ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजूर हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतात.त्यावरच त्यांची अर्थव्यवस्था चालते.या व्यवसायात नैसर्गिक अडचणीसह सरकारी धोरणामुळे अत्यावश्यक कायदा,जमीन अधिग्रहण कायदा अशी बंधने घालण्यात आलेली आहेत.समाजवादी विचारसरणीतून शेतकऱ्यांना तोट्यात घालण्याचे काम सुरू आह.शेतीचा उत्पादन खर्चही निघण्याची व्यवस्था राहिलेली नाही.त्यामुळे आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत.पुढील पिढीला तरी यातून सुटका मिळावी, देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुख-सन्मानाने जगता यावे, शेतकऱ्यांना बाजारपेठ व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे,या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत.युवा संपर्क अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करून व्यापक आंदोलन उभे करण्यात येणार आहे.सरकारची जाचक बंधने झुगारून लावण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख मदन सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, उपाध्यक्ष वसंत कंदगुळे,हनुमंत सोमवंशी,सचिन पाटील, समाधान कांबळे,विठ्ठल संपते, युवराज सोमवंशी,नरसिंग पाटील, प्रथमेश सोमवंशी,शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष बालाजी सोमवंशी,युवा आघाडी तालुका प्रमुख विवेक पाटील,राम संपते,दगडू चेवले,हणमंत सोमवंशी,जीवन सोमवंशी,चत्रभुज सोमवंशी,महादेव कांबळे,विठ्ठल सोमवंशी,तुकाराम सोमवंशी,लक्ष्मण सोमवंशी,शेषेराव सोमवंशी,पिंटू सोमवंशी,गोविंद यादव,विठ्ठल पंडितराव सोमवंशी,नागू मुस्के यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा