चाकूर एमआयडीसीसाठी लवकरच भूसंपादन-खा.सुधाकर शृंगारे
( लातूर -प्रतिनिधी )लातूर जिल्ह्यातल्या चाकूर येथे नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या एमआयडीसीसाठी लवकरच भूसंपादनाची कार्यवाही सुरुवात करण्यात येणार आहे . या संदर्भात मुंबई येथील एमआयडीसीच्या कार्यालयात खासदार सुधाकर शृंगारे यांनी मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन भूसंपादनाची कार्यवाही सुरुवात करण्या बाबत मागणी केली आहे . चाकूर तालुक्यातल्या घरणी-घारोळ -नांदगावच्या शिवारात हि नवीन एमआयडीसी उभारण्यात येत आहे , त्यासाठी कोट्यवधींचा निधी सरकारने मंजूर केला आहे . अशी माहिती खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली आहे . एमआयडीसी कार्यालयात झालेल्या या भेटी वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा , व्यवस्थापकीय संचालक रंगा नाईक , माजी मंत्री विनायकराव पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते . विनायकराव पाटील यांनी चाकूर येथे एमआयडीसी मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न केलेले आहेत .चाकूर येथे एमआयडीसी सुरुवात झाल्या नंतर अनेक मोठे उद्योग उभारले जाणार असून त्यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे . चाकूर तालुक्यातल्या शेकडो युवकांना रोजगाराची आणि उद्योग निर्मितीची संधी उपलब्ध होणार आहे . खाद्यतेल , स्टील ,दुग्ध व्यवसाया बरोबरच , अनेक प्रक्रीया उद्योगांना प्रोत्सहान मिळणार आहे . चाकूर तालुक्यातल्या वडवळ,जाणवळ , लातूररोड,मोहनाळ,घरणी,गांजूर भागात सोयाबीन आणि टम्याटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते . यावर आधारित व्यवसायही या नवीन एमआयडीसी मध्ये सुरुवात होणार आहेत.
---माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी चाकूर येथे एमआयडीसीला मंजुरी मिळावी अशी मागणी करून त्यासाठी पाठपुरावाही केलेला आहे . महाविकास आघाडीच्या काळात या एमआयडीसीला पूर्णत्वाकडे नेण्यासाठीची कार्यवाही थंडावली होती . मात्र आता खासदार सुधाकर शृंगारे यांनी यामध्ये आग्रही भूमिका घेतल्याने लवकरच एमआयडीसीच्या भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे . मुंबई येथे झालेल्या भेटीत चाकूर एमआयडीसीसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा आणि भूसंपदांनाची कार्यवाही लवकरात लवकर सुरुवात करावी ,त्याच बरोबर जमीन संपादन करताना कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली आहे . मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कोट्यवधींच्या विकास निधीमध्ये चाकूर एमआयडीसीचाही सहभाग आहे . लातूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारणे ,रस्ते दुरुस्ती ,वॉटर ग्रीड प्रकल्पातून लातूर शहराचा पाणी पुरवठा ,या बरोबरच चाकूर एमआयडीसी स्थापन करण्यासाठी म्हणून लातूर जिल्ह्यासाठी २००० कोटींच्या निधी जाहीर करण्यात आलेला आहे . भूसंपादनाची कार्यवाही लवकरात लवकर सुरु करून चाकूर येथे नवनवीन उद्योग यावेत यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांचा प्रयत्न असणार आहे . या एमआयडीसीमुळे चाकूर तालुक्याचा कायापालट होणार आहे .
टिप्पणी पोस्ट करा