मेरा ग़म कितना कम है

मेरा ग़म कितना कम है


दुनिया में कितना ग़म हैं मेरा ग़म कितना कम हैं। लोगोंका ग़म देखा तो मैं अपना ग़म भूल गया ॥


किती क्षुल्लक तक्रारी असतात आपल्या ? अगदी चहा वेळेवर नाही मिळाला, दुधवाला वेळेवर नाही आला किंवा एखादी वस्तू जागेवर नाही मिळाली म्हणून संतापणारी, एकमेकांवर ओरडणारी, घर डोक्यावर घेणारी माणसं आपण. आपल्या लक्षातच येत नाही की आपण नशीबवान आहोत, आपल्या भोवती माणसं आहेत! आपल्या अवतीभवतीचा हा किलबिलाट आनंददायी आहे. उपलब्ध असलेल्या गोष्टी सवयीच्या होऊन आपल्याला त्यांचे महत्त्व जाणवेनासे होते. यातल्या अनेक गोष्टी आपल्याला जन्माने व नशिबाने प्राप्त होतात. मात्र त्यांच्याबाबत आपण कृतज्ञ नसतो. त्यांना गृहीत धरूनच विचार करण्याची सवय आपल्याला लागलेली असते.

       कधी - कधी विनाकारण जवळच्या मोठ्या दवाखान्यामध्ये फेरफटका मारून तिथल्या रूग्णाचे दुर्धर आजारपण, व्यथा, वेदना, त्याच्या नातेवाइकांची होणारी धावपळ, गैरसोय अनुभवली पाहिजे. फुटपाथवर उपाशीपोटी निजलेल्या निराश्रितांची विवंचना, गरीब वस्तीतील लोकांची अभावग्रस्तता, वृद्धांचे एकाकीपण हे सारे अनुभवले, की आपले दुःख आपल्या तक्रारी त्यापुढे थिट्या वाटू लागतात. आपण कितीतरी सुखी आहोत, धन्य आहोत याचा प्रत्यय येतो. आपल्याला दृष्टी, श्रुती आणि वाचा आहे. आपले हातपाय शाबूत आहेत. यासाठी आपण स्वतःला नशीबवान मानले पाहिजे.असे कितीतरी लोक एखाद्या जन्मजात आजाराने, अपंगत्वाने जे सोसत आहेत, त्यांचे दुःख खरे आणि शाश्वत आहे. असंख्य लोक नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अपघाताने मोठ्या अनपेक्षित संकटांना बेसावधपणे सामोरे जातात. त्यांना जीवनाची यत्किंचितता समजल्यामुळे ते ऊर बडवत बसत नाहीत किंवा आत्महत्याही करत नाहीत. मला चप्पल नाही म्हणून रडणाऱ्याला पायच नसलेल्याचे दर्शन झाले की मग तो भानावर येतो. तसे जगाच्या सुखाऐवजी दुःखाशी आपल्या समस्यांची तुलना करून पाहिल्यास प्रश्नांचा गुंता आपोआप सुटू लागतो. समस्या सर्वांनाच असतात. आणि सगळ्याच गंभीर प्रश्नांना साधीसुधी उत्तरेही असतात, मात्र आपल्याला आपल्या सोयीची उत्तरे हवी असतात. इथेच खरी मेख आहे.

 निदा फाजली यांचा एक सुंदर दोहा आहे.

'रस्ते को भी दोष दे, आँखे भी कर लाल चप्पल में जो कील है, पहले उसे निकाल'


@किशोर जाधव


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने