संपर्क वाढला अन् संवाद तुटला का?
सध्या सोशल मिडिया वर फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप,इन्ट्राग्राम,टेलीग्राम, इत्यादी सोशल मीडियामुळे मैत्रीचं जाळं 'दाट झालेलं वाटतं पण संवादापेक्षा चॅटिंग महत्त्वाचं ठरलं. आधीच भ्रांतचित्त झालेलं सध्याचे मानवी मन सतत जनसंपर्काच्या गरजेमुळे विखंडित झालं दिसत आहे. मोह आणि संभ्रमाच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या व व्यक्तिस्वातंत्र्याच्या अनोख्या व्याख्या रूढ व्हायला सुरुवात झाल्यात. पारंपरिक लग्नाला आता लिव्ह-इन-रिलेशनशिप्सचा आणि समलिंगी विवाह संबंधाचा पर्याय काहींनी स्वीकारला आणि काही स्विकारण्याची तयारी पण ठेवलेली दिसून येत आहे. एकेकाळी अशी नाती लपवली जात, आज या नात्यांना सुप्रीम कोर्टानेच मान्यता दिली आहे. हे सगळं गेल्या वीस बावीस वर्षांत झालं आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे माणसामाणसांमधल्या संपर्काच्या संधी वाढल्या, पण माणसांमधला संवाद तुटला, असं मोठ्या पिढीकडून लहान पिढीला सांगितलं जातं. शहरात वाढणाऱ्या 'जनरेशन नेक्स्ट'चं मत मात्र असं नाही. या तरुण पिढीच्या मते संपर्क म्हणजेच संवाद. वयस्क पिढीला संवादाची आस होती. संवादात दोन्ही पिढ्या समान स्तरावर असतात आणि दोन्ही सशरीर एकमेकांच्या समोर येतात. मात्र आय. टी. प्रवीण युवा पिढीला ही व्हर्चुअल रिअॅलिटी पुरेशी वाटते. स्मार्टफोनद्वारे संपर्क करणं तिला आवडतं. ही पिढी संपर्कशील आणि संपर्कोत्सुक आहे. तिला व्यक्तिगत संवादाऐवजी सामाजिक संपर्क महत्त्वाचा वाटतो. तिला आत्मापरमात्मा या गोष्टी कळत नसल्या तरी त्याचा मतलब कळतो. जुन्या पिढीला स्थैर्याची मातब्बरी वाटत होती, नव्या पिढीला अस्थैर्याचा प्रॉब्लेम वाटत नसावा.मीडिया आणि मार्केट या दोन्ही गोष्टी माणूस असेपर्यंत राहतील. त्यामुळे त्यांचा बाऊ न करता दोन्हींचा कल्पक वापर करून मानवी कल्याण कसं साधता येईल यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. म्हणजे येणाऱ्या काळाची भीती वाटणार नाही. मीडिया आणि मार्केटचा आपल्यावरचा प्रभाव कमी करणे शक्य आहे. त्यासाठी साधं जगण्याचा पर्याय आपल्यासमोर आहे. चैनीच्या गोष्टी गरजेच्या समजल्याने उपभोक्तावाद वाढतो. त्याचबरोबर गरीब-श्रीमंत दरीही वाढत जाते. ती कमी करणं आपली जबाबदारी आहे. स्वतःचा उपभोग कमी करूनच ती दरी कमी करता येते. हे एकदा कळलं की पोस्टमॉडर्न काळाचंसुद्धा नीट स्वागत करता येतं. येणाऱ्या काळात तंत्रज्ञान हे सतत बदलत राहणारंच आहे. तसाच बदल आपणही स्वतःमध्ये करायला हवा. बदलत्या काळासोबत स्वतःला जुळवून घेता आलं पाहिजे. स्वतःला नव्याने घडवतात आलं पाहिजे. नव्या गोष्टींचे स्वागत करायला हवे. मानवाची प्रगतीही याच क्रमाने झाली आहे.यामुळे नव्या होणा-या बदलाला सामोरे जावे लागते व सामोरे गेल्याशिवाय पर्याय राहायला नाही.
@किशोर जाधव
टिप्पणी पोस्ट करा