आपण नेहमी वर्तमानात जगायला हवं !

आपण नेहमी वर्तमानात जगायला हवं !

एकदा एक भिक्खू त्याच्या अनुयायांसह प्रवास करीत असताना एके ठिकाणी एक छोटासा ओढा एका स्त्रीला ओलांडता येत नसल्याने ती तिथेच कुणाच्या तरी मदतीची वाट पाहत होती. साधूने त्या स्त्रीची अडचण लक्षात घेत तिचा हात हातात घेऊन तिला ओढा ओलांडण्यास मदत केली. ती वाहून जाऊ नये म्हणून त्यांना एकदा तिच्या कमरेपाशी हात घालून तिला पकडूनही ठेवावे लागले. नदी ओलांडल्यानंतर स्त्रीने साधूचे आभार मानले. पुढे खूप अंतर चालून गेल्यावर त्यांच्या एका शिष्याने त्यांना विचारले, की आचार्य, तुम्ही तर संन्यासी आहात. तुम्हाला स्त्री स्पर्शच वर्ज्य आहे. इतकेच काय तर स्त्रीकडे बघणेसुद्धा निषिद्ध आहे. तर मग तुम्ही त्या स्त्रीला कसा काय आधार दिला? साधूचे उत्तर खूप सुंदर होते. ते म्हणाले, की मी तर त्या स्त्रीला काठावरच सोडून आलो. तू मात्र तुझ्या मनात तिच्या विषयाचे ओझे अजून वागवत आहेस.नदी ओलांडताना आपण नावेतून गेलो, तर ती नाव तिथेच तीरावर सोडून पुढे जातो. किंवा एखाद्या उथळ जागेवरून प्रवाह ओलांडताना आपल्या सोयीसाठी आपण काही दगड पाण्यात टाकतो त्यावर पाय देऊन पुढे निघून जातो; पण ते दगड आपण पुन्हा सोबत उचलून नेत नाही. मात्र हेच साधेसोपे व्यावहारिक शहाणपण जीवन जगताना आपण वापरायचे विसरतो. माझ्या एका कवितेत मी लिहिलेय, की'माजघरामध्ये जी अंधारात हरवलेली
आहे.अंगणातल्या उजेडात ती वस्तू शोधत आहे मी' अशी अनेकांची अवस्था असते. भूतकाळातील कुठल्याशा कटू गोड आठवणी वेताळासारख्या पिच्छा पुरवतात, पाठ सोडत नाहीत. त्यातून माणसाला त्याच त्या जखमा भळभळत ठेवण्याची व तेच जुने दुःख उगाळून रडत बसण्याची सवय जडते. मान्य, की एखादी खूप वाईट घटना तुमच्यासोबत घडलेली असेल. त्याचं दुःख खूप मोठं असेल, पण आयुष्य खूप छोटं आहे आणि तितकंच अनमोलदेखील. त्यामुळे ते असं निरर्थकपणे वाया घालवण्यासाठी नाहीये. जे हिरवलं गेलं किंवा नाही मिळू शकलं, त्यासाठी आयुष्यभर आदळआपट करण्यात काही हशील नाही. वस्तुस्थिती समजून घेऊन सद्यपरिस्थितीत ज्या संभावना आहेत, त्यातील आनंदाला आपण का पारखे होतो ?प्रत्येकालाच सचिन, आमिताभ किंवा एम. एफ. हुसैन व्हायचे असते. फार थोड्या लोकांना हे कळतं, की आपण आपल्या कथेचे नायक आहोत. ते स्वतःसारखे होतात. त्यांची ओळख बनते. आपल्याला आपल्यासारखे व्हायची गरज आहे.

@किशोर जाधव

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने