वाचनातून आजार बरे करणारी वैद्यकीय अभ्यास शाखा सुरु-डॉ.सूर्यनारायण रणसुभे

वाचनातून आजार बरे करणारी वैद्यकीय अभ्यास शाखा सुरु-डॉ.सूर्यनारायण रणसुभे





लातूर (प्रतिनिधी)- जगभरातील मानवी समूह विविध ताण-तणावातून जात असून,त्यामुळे त्याला रक्तदाब,मधुमेह आदी अनेक गंभीर आजार जडत आहेत,त्यावर औषधोपचाराने ईलाज तर केला जातोच आहे तथापि अलिकडे वाचनातून आजार बरे करण्याचे शिक्षण देणारी शाखा वैद्यकीय अभ्यासक्रमात सुरु झाली असल्याचे सांगून,मानवी मूल्ये जोपासणारे,जीवनाला दिशा देणारे,जीवन बदलून टाकणार्‍या ग्रंथांचे वाचन झाले पाहिजे असे प्रतिपादन थोर साहित्यिक डॉ.सूर्यनारायण रणसुभे यांनी केले.
औसा तालुक्यातील माळकोंडजी येथील गोपाळबुवा सार्वजनिक ग्रंथालयात रविवार,दि.१३ ऑक्टोबर रोजी आयोजित दिवाळी अंक प्रदर्शन व गुणवंतांचा सत्कार समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षपदी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे हे होते.मंचावर ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष साहित्यिक डॉ.शेषराव मोहिते, शिरुर अनंतपाळ शिक्षण संस्थेचे प्रभाकरराव कुलकर्णी, गोपाळबुवाची जीवनगाथा लेखक मधुकर कुलकर्णी,पीएचडी मार्गदर्शन प्रा.विजयकुमार मित्रा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ग्रंथालयाच्या रुपाने माळकोंडजीत दर्जेदार पुस्तकाचे गावच उभारले आहे,अनेक वर्षाचा अनुभव लेखक एका ग्रंथात मांडतो.शब्दात ताकद असते,ग्रंथ वाचनाने माणूस समृध्द होतो. मनुस्मृतीच्या विषाने देशातील अनेक पिढ्या बरबाद केल्या.साने गुरुजींच्या पुस्तकांनी मूल्य जगणारी पिढी घडविली.२०१४ नंतर देशात विष माणसात विष पेरणार्‍या ग्रंथाचे मोठ्या प्रमाणात प्रकाशन झाले. विष की अमृत देणारे ग्रंथ यातून आपण मानवी मूल्य जपणारे ग्रंथ निवडावे,तुलसीदाच्या साहित्याने विषच पेरले,त्याविरोधात संत  कबीरांनी साहित्य निर्माण केले. संत साहित्याने मानवी मूल्यांचे दर्शन घडविले,असे सांगून पुढे बोलताना डॉ.रणसुभे म्हणाले की,इंग्रजीविषयीचा लोकांचा आता भ्रमनिरास होत आहे,धोका लक्षात आला आहे, मातृभाषेतून शिक्षण घेणारे मेरिटमध्ये येतात,देशातल्या शास्त्रज्ञांचे शिक्षण मातृभाषेतून झाले आहे,हे लक्षात घेवून मातृभाषेचे महत्व ओळखावे असेही ते म्हणाले.
ग्रंंथ माणसाला आत्मविश्‍वास देण्याचे काम करतात,हा स्वानुभव सांगून डॉ.शेषराव मोहिते म्हणाले,शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही,गेल्या ४० वर्षांत उच्च शिक्षणाने अनपेक्षित बदल झाले. आता प्रगत जगाला तांत्रिक मनुष्यबळाची गरज आहे,मातृभाषेतून शिक्षण मिळणे आवश्यक आहे,इंग्रजीतून शिक्षण घेणारी पिढी इधर ना उधर होत आहे.त्यांना वाचनापासून,संस्कृतीपासून तोडण्यात येत आहे, परिणामी पुढच्या पिढ्या बौध्दिकदृष्ट्या बरबाद होतील. काहींना हा धोका लक्षात येत आहे,नीटमध्ये सीबीएस पेक्षा मराठी माध्यमातून आलेले विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मराठी शाळाच संस्कारक्षम मुले घडवतील असेही त्यांनी सांगितले.
ग्रंथ माणसाला कार्यप्रवण बनवतात,संकटातून नेहमीच चांगले घडत असते.ग्रंथालयातून ज्ञानाचा प्रसार होतो,समाजाला उर्जा मिळते असे विचार प्रभाकरराव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात सुनील गजभारे यांनी मोबाईल,टी.व्ही.च्या प्रभावातून विद्यार्थ्यांना दूर करुन सर्वच स्तरातील वाचकांपयर्ंत ग्रंथ नेण्यासाठी प्रयत्न करावेत,असे सांगून या ग्रंथालयाची विस्तारीत ईमारत उभारण्यासाठी सहकार्य करु अशी ग्वाही दिली.
यावेळी डॉ.माधव जगताप,ज्योती महाळंगीकर,बलभीम भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यंाच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन,दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.ग्रंथालयाचे अध्यक्ष दिवं.उध्दव उस्तुरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव ग्रंथमित्र पांडुरंग अडसुळे यांनी केले.सूत्रसंचालन बाळ होळीकर यंानी केले.ग्रंथपाल शिवलिंग अडसुळे यांनी आभार मानले.यावेळी मान्यवरांसह पीएचडी मार्गदर्शक डॉ.धनंजय घटकार, आदिवासी मुलांसाठी काम करणारे बलभीम भालेराव, आदर्श शिक्षिका ज्योती महाळंगीकर, ग्रंथालय नेट परिक्षा उत्तीर्ण पल्लवी अडसुळे, उच्च शिक्षणासाठी जर्मनीला गेलेल्या शुभम हराळेेचेे पालक जयप्रकाश हराळे, दहावीचे गुणवंत दिपाली घोंगडे, ङ्गिजा शेख, ऋतुजा क्षीरसागर,बारावीचे गुणवंत किरण कांबळे, ऐश्‍वर्या कुलकर्णी, ग्रंथालय तांत्रिक सहाय्यक डेंगळे, गुरुगौरव पुरस्कार प्राप्त संजय चिद्रेवार यांचा निवडक प्रबोधनकार-संविधानग्रंथ,शाल,पुष्पहार देवून गौरव करण्यात आला.  
या कार्यक्रमासाठी अंकुश भंडे, प्रकाश विभुते,सोपान कांबळे,ज्ञानोबा माळी,मारुती बरडे, इंजि.हरिदास अडसुळे,ज्ञानेश्‍वर अडसुळे,आनंद अडसुळे,लिपीक रामलिंग अडसुळे,शिपाई सिंधु हजारे, पुष्कर मोरे,नारायण अडसुळे,गिरीधर जंगाले,सूर्यकांत जाधव,विकास चिरके,आदिंनी सहकार्य केले.कार्यक्रमाला असंख्य वाचक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने