दुर्दम्य इच्छा शक्तिची स्वामिनी - हेमलता जीवनधर शहरकर

दुर्दम्य इच्छा शक्तिची स्वामिनी - हेमलता जीवनधर शहरकर 







                 निवृत्त शिक्षिका, नारी प्रबोधन मंचच्या माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर शहरकर यांच्या सुविदय पत्नी सौ. हेमलता जीवनधर शहरकर, सतत हसतमुख व्यक्तिमत्व, सातत्याने कार्यरत, कलेची आवड, गोड गळा, दांडगी स्मरणशक्ती सकारात्मक दृष्टिकोण, विचार आणि कृतीची सांगड अत्यंत सहजतेने घालण्याची कुशलता, सहनशीलता, प्रवास, नाटक, गाणे यांची आवड, मैत्र भाव, सहज संपर्कात आलेल्या प्रत्येकाला जीव लावून आपलेसे करण्याची कला अवगत, अन्यायाची चीड बहुगुणी व्यक्तिमत्वाच्या धनी हेमलताताई. 
                  संगीत, नाटक याची आवड असल्याने गाण्याच्या
परीक्षा दिल्या. शिबीरांना, मेळाव्याला जात असत. १९४९ साली इंदापूरचे कुमार शिबीर १९५० साली सांगलीला सेवादलाचे शिबीर, आंतरभारतीचे मेळावे यामुळे अनेक थोर व्यक्तींना जवळून पाहण्याची, ऐकण्याची संधी मिळाली. यामध्ये साने गुरुजी, वसंत बापट, लीलाधर हेगडे, रावसाहेब पटवर्धन आचार्य शे.दा. जावडेकर, भाऊसाहेब रानडे अशा थोर व्यक्तिंचे संस्कार बालपणापासून मिळत गेले. त्यामुळे सुजाण व्यक्तिमत्व घडले असेच म्हणावे लागेल.
                  १९४९ साली हैद्राबादच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर मराठवाडा निजामशाहीतून मुक्त झाला, लातूर येथील तहसीले कार्यालयावर पहिले शासकिय ध्वजारोहण झाले त्यावेळी या पहिल्या ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रगीत म्हणण्याची संधी हेमलताताईंना मिळाली. विशेष म्हणजे पुढे ही परंपरा बरेच वर्ष सुरु होती. १५ ऑगस्ट,२६ जानेवारी, १७ सप्टेंबर या राष्ट्रीय सणांना राष्ट्रगीत म्हणण्यासाठी ताईंना सायकलवरून कोणी ना कोणी येऊन घेऊन जात असत.
                    गंजगोलाई येथे एक उंच मनोरा होता व या मनो-या भोवती एक कट्टा होता, तेथे नेहमी सभा, मेळावा भरत असे येथे नेहमी हेमलताताईंना बोलावून नेण्यात येत असे. एकदा धिटाईने उभे राहून गाताना या लहानगीला जयराम व जयमाला शिलेदार यांनी पाहिले, जयराम शिलेदार व जयमाला शिलेदार यांची नाटक कंपनी होती.त्यांनी  नाटकाम काम करण्यासाठी पाठवावे असे सुचवले व अनेकदा विचारणाही केली, परंतु हेमलताताईच्या वडीलांकडून परवानगी काही मिळाली नाही. 
               १९४९ साली आर्यसमाजाच्या 3 दिवसीय अधिवेशनात पंडीत नरेंद्रदेव, विनायक विद्यालंकार, फुलचंद गांधी असे दिग्गज लोक आले होते. येथे ही त्यांनी गीत गायन केले. प्रांतिक कलापथकाचे कार्यक्रम त्यावेळी गावोगाव होत असत. सांस्कृतिक कार्यक्रमातून जनजागृती व प्रबोधनाचे कार्य केले जाई. या कलापथकातून प्रेरणा घेऊन राष्ट्र सेवादल कलापथकाची स्थापना लातूर येथे झाली. हेमाताई येथे ही उत्साहाने कार्यरत होत्या. 
              १९५४ साली नगरहून ताई लातूरला आल्या. गोदावरी शाळेत १० वी.चा वर्ग निघाला होता आणि जेमतेम मुली होत्या. एकूण १३ मुली. याही पालकांची खूप मनधरणी करुन उपस्थित झाल्या. संस्थेने पालकांच्या अडचणी समजून घेऊन, छकड्याच्या पडदा लावलेल्या गाडीची सोय त्यांच्यासाठी केली १० वी ची परीक्षा अंबेजोगाई येथे जाऊन दयावी लागली. ५ मुली उत्तीर्ण झाल्या त्यातल्या हेमलताना हे एक होच्या. इतकेच नाही तर आशा पटवर्धन, आशा सताळकर, कमल रायचूरकर, कांता पारसेवार व हमला रामढवे यातून त्या पहिल्या आल्या. वय कमी असल्याने सरकारी नोकरी मिळाली नाही पण गोदावरी लाहोटी कन्या प्रशालेत नोकरी लागली अन् तब्बल ४१ वर्षे निष्ठेने पूर्ण केली. 
                  नोकरी मध्ये सहशिक्षिकांसोबत घनिष्ठ संबंध जमले आणि मैत्री वृद्धींगत होत गेली. विविध उपक्रम राबवत सहलींच्या निमित्ताने केलेला प्रवास, मेळावे, स्पर्धा यातून विश्व फुलत गेले, अनुभवविश्व समृद्ध होत गेले. १९६८ साली NOC अंतर्गत, १९७२ साली NIC अंतर्गत पाँडिचरी येथे १९७५ ला दिल्ली येथे सहली घेऊन जाऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व दमदार पद्धतीने केले. यामध्ये त्यांच्यासोबत सुमतीलाई जगताप, कुलकर्णी बाई होत्या. सुमतीताई गाणी लिहायच्या आणि हेमलताताई त्या बसवून घ्यायच्या. त्यांनी बसवलेल्या महाराष्ट्राच्या कोळीनृत्याने प्रथम क्रमांक पटकावला, वार्षिक स्नेहसंमेलनात नवनवे अभिनव प्रयोग करून अन्नदाता व भारत दर्शन सारखे कार्यक्रम बसवले. NCC कॅम्प मध्ये अनेक उपक्रम घेतले. रात्रीचे अभ्यासवर्ग घेतले, शारदोत्सवा निमित्ताने ही उपक्रम घेतले. गणितासारखा अवघड विषय ही सोपा करून क्लृप्त्या देऊन शिकवण्याचा त्यांचा हातखंडा होता. 
                    हेमलताताईंची सहनशीलता वाखाणण्याजोगी होती. मुलीच्या जन्माच्या वेळी परिस्थिती आणि सासू बाईंच्या सोवळे पाळण्याच्या स्वभावामुळे त्यांनी स्वत:च स्वताचं बाळंतपण केलं. विशेष म्हणजे त्यांना कसलेही बोल न लावता. हे म्हणजे त्यांची सहनशीलतेची परिसीमाच होती. इतक नाही तर तडजोड करण्याचा विचार इतका अंगी भिनला होता की चार पिढ्यांना त्यांनी एकत्र बांधून ठेवले. सासूबाई, त्या स्वतः, सून आणि नात सून या पिढ्यांमधील अंतर त्यांच्या सहन- शीलतेने, तडजोडिने, वात्सल्याने त्यांनी कमी केले आणि सर्वांना एकत्र गुंफून ठेवले. 
                     जिद्द अशी होती, किती ही संघर्ष करावा लागला तरी आपले ध्येय गाठायचे. शिक्षणासाठी भटकंती झाली आणि अखेर नोकरी मिळाली. पण त्यावर त्या थांबल्या नाहीत तर लग्नानंतर सगळ्या जबाबदा-या पार पाडत त्यांनी बी.ए, एम.ए, बी.एड पूर्ण केले. याचबरोबर नाटक वेड  जबरदस्त होते. लातूर येथे १९९५ ला कलोपासक मंडळाची स्थापना झाली. त्यावेळी त्यांनी 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकाचे नाट्य वाचन केले होते. लग्न जमल्यानंतर तुझं माझं जमेना " या नाटकात काम करायला जरी त्यांच्या वडीलांनी परवानगी दिली नसली.ते ही स्वत: जीवनधर शहरकर सोबत असताना, तरी पुढे जाऊन त्या दोघांनी एकत्र नाटके केली. पारितोषिकेही मिळवली. शारदोत्सव मंडळातर्फे 'पुढारी पाहिजे', 'पाणीग्रहण' या नाटकांत दोघांनीही काम केले. तसेच राजस्थान संस्थेने बसवलेल्या 'तुझे आहे तुझपाशी' या नाटकात दोघांनीही काम केले आणि पारितोषिक मिळवले. 
                   सकारात्मक दृष्टिकोनाने चालत राहणे हा त्यांचा स्वभाव. लग्नानंतर घर आणि नोकरी दोन्ही सांभाळणं म्हणजे त्याकाळी दिव्यच. कारण पहाटे उठून जात्यावर दळण दळावे लागे इतकेच नाही तर सासूबाईच्या सोवळे-ओवळे संकल्पनेमुळे खूप काही सहन केले. ते ही तोंडातून कुठलाही तक्रारीचा सूर न काढता. हो यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि हो त्यांना न दुखावता. विज्ञानाच्या दृष्टीने सोवळ्याच्या संकल्पना हळूहळू त्यांना पटवून त्यांच्या मध्ये बदल होण्यास बराच काळ गेला. 
                 नोकरी करत असतानाच १९७८ साली महाराष्ट्र पातळीवर राज्य कर्मचार्यांचा संप सुरू झाला. हा संप केंद्राप्रमाणे महागाई भत्ता मिळावा,पगारवाढ व्हावी यासाठी होता. रा. ग. कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली संप सुरू होता. यानिमित्ताने १० दिवसांचा कारावास त्यांनी अनुभवला. 
                 आर्थिक टंचाई, जागेची अडचण पण मनात काम करण्याची जिद्द दोघा पती-पत्नी च्या अंगी होती. त्यामुळे २४ वर्षे शहरकर  गुरुजींचा मुक्काम राजस्थान विद्यालयात असे. ते तेव्हा तेरा वर्तमानपत्रांची पत्रकारिता सांभाळत होते. लोकसत्ता, नवभारत टाइम्स, प्रभात, केसरी, सकाळ, मराठवाडा, गोदावरी समाचार, प्रजावानी, गावकरी, संचार, सोलापूर समाचार, पुढारी, तरुण भारत इ. त्या काळात सुरुवातीला टायपिंग मशीन नव्हते, तेव्हा बापूंना बातम्यांच्या हस्तलिखित प्रती तयार करण्याच्या कामात हेमलताताई मदत करत असत. टायपिंग मशीन आल्यावर शहरकर गुरूजी शाळेतच मुक्कामाला जात, व बातम्या  टाईप करण्याचे काम करत असत. अशी हेमलताताईंची साथ होती म्हणूनच समाजाचा संसार, पत्रकारिता, नोकरी, समाजकार्य याला वाहून घेऊ शकले. 
                     समाजवादी विचारसरणीच्या आणि सेवा दलाच्या मान्यवरांचे सातत्याने
घरी येणे-जाणे, त्यामुळे विचारांचे आदान-प्रदान होत असे. त्यातच राष्ट्रीय सेवादलात कार्यरत असल्याने विचारांची 
प्रगल्भता होती. एस. एम. जोशी, गोविंदभाई
श्राफ, बापूसाहेब काळदाते, यदुनाथ थत्ते, चंद्रकांत शहा यांच्या सारख्या मातब्बर व्यक्तिमत्त्वांचा सहवास सातत्याने लाभला आणि हेमलताताईंचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होत गेले. 
              १९९९ साली नाही प्रबोधन मंच या संस्थेच्या त्या अध्यक्ष झाल्या बचतगट, महिला मेळावे, पाळणाघर, समुदेशन केंद्र अशा उपक्रमांद्वारे सक्रिय राहिल्या. सातत्याने कार्यरत राहणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गोड गळ्याच्या आणि गाण्याच्या वेडाचे अनुभव नारी प्रबोधन मंचच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेल्या प्रवासात मिळत असत. प्रवासात अंताक्षरी खेळणे, भेंड्या लावणे अशाप्रकारे अनेक गीतांना ऐकण्याची संधी आम्हाला मिळत असे. त्यांच्या स्मरणशक्तीचे आश्चर्य वाटे.अन्य गीतांसोबत प्राथमिक शाळेत शिकलेल्या कविता त्यांना आजही तोंड पाठ होत्या.  त्यांनी १९९६-९७ मध्ये औराद शाहजनीच्या कॉलेजला मराठी विषयाचे अध्यापन  विशेष म्हणजे सतत २ वर्ष विनामोबदला आनंदाने, उपक्रमयुक्त हे सर्व केले. 
                  पुरोगामी विचारांची कास त्यांनी अखेर पर्यंत सोडली नाही. त्या जरी जैन धर्मिय असल्या तरी कट्टरपंथी नव्हत्या. एक आत्मिक शांतीसाठी धर्माचा आधार त्या घ्यायच्या,आणि चौकटीच्या आत तो असायचा.
                    मैत्री करण्यात, सांभाळण्यात आणि टिकवण्यात पारंगतच होत्या. गेली ६० वर्ष सहदय मैत्री जपणं हे तसे सोपं नाही. त्यांच्या मैत्रित शैक्षणिक, सामाजिक, राजकिय चर्चा होत असत. मतभेद ही होत असत. परंतु मनभेद कधीच नव्हते. मन भेदाला त्यांनी कधीच थारा दिला नाही. तसेच बायकांची मैत्री म्हटले की घरगुती चर्चा हे गृहितच धरलं जातं परंतु ते त्यांनी कधी केले नाही हेमलताताई, सुमतीताई, मालतीलाई, अचलाताई या आणि अन्य मैत्रिणींनी मैत्रिचे बंध कायम जपले.
                     त्यांच्यासाठी २०१० हे वर्ष त्रासदायक ठरले. २७ जानेवारी २०१० रोजी मैत्रिण सुमतीताई जगताप यांच्यासोबत डॉक्टरांकडे गेल्या. तपासण्या, रिपोर्टस या सर्वामध्ये शांतपणे, खंबीर राहून  थोडे ही स्वत: विचलित न होता त्यांनी या सर्व दुखदाई  क्षणांना तोंड दिले. हा दुखदाई प्रवास ऐवढ्यावरच थांबला नाही. संघर्षरत व्यक्तिला जरा जास्त परिक्षांना तोंड द्यावे लागते. त्याप्रमाणे कॅन्सर, दोन वेळेस हार्ट अॅटक, टी.बी., मलेरिया, कोरोना या सर्वांशी दोन हात करून त्यांनी लढाई जिंकली. प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार, सुख-दु:ख, यश-अपयश येतच असते पण अशा प्रसंगांकडे, क्षणांकडे आपण कोणत्या दृष्टिने पाहतो, त्याला किती सकारात्मकतेने घेतो त्यावर त्याचे यश अवलंबून असते. हेमलताताईनी सकारात्मकतेने, जिद्दीने, धाडसाने निर्धाराने या दुखद प्रसंगांना तोंड दिले त्यामुळेच या एवढं समृद्ध आयुष्य जगू शकल्या. त्यांच्या या दुर्दम्य इच्छाशक्तिला सलाम !
 भावपूर्ण श्रध्दांजली! 





- प्रा.नयन भादुले-राजमाने, 'साहित्यनयन', लातूर
८८०५४२६०७१

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने