साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी  अर्ज करण्याचे आवाहन 

लातूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग समाजातील व तत्सम 12 पोट जातीतील दारिद्र्य रेषेखालील महिला, पुरुष घटकांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षात थेट कर्ज योजनेतून एक लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध  करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत असून यावर्षी 70 प्रकरणांचे उदिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेसाठी 20 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थेट कर्ज मागणी अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे), आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड व मतदान कार्डची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे. तसेच अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोर 500 असावा. अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे.
 अर्जदाराला निवडलेल्या व्यवसायचे ज्ञान व अनुभव असावा. तसेच तो प्रशिक्षीत असावा. अर्जदाराने महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायासाठी आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, करारपत्रे कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. या योजनेत पुरुष आणि महिला 50 टक्के आरक्षण राहिल. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य राहणार असून अर्जदारास कर्ज मंजुरी नंतर दोन जमीनदार देणे बंधनकारक आहे. यामध्ये एक नोकरदार असावा, तसेच त्याच्या कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखाचे वसुलीसाठीचे हमीपत्र द्यावे. दुसरा जमीनदार मालमत्ताधारक असावा. अर्जासोबत दोन फोटो, व्यवसाय दरपत्रक (कोटेशन) जोडावे. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती यांचे पालन करणे बंधनकारक राहील.
मांग, मातंग समाजातील व तत्सम 12 पोटजातीतील राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कारप्राप्त महिला आणि पुरुषांना प्राधान्य राहिल. तसेच सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसाच्या एका सदस्यास प्राधान्याने लाभ दिला जाईल.शहरी आणि ग्रामीण भागातील मातंग समाजाच्या गरजू लाभार्थ्यांनी 28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2022 दरम्यान लातूर जिल्हा कार्यालय येथून स्वत: कर्ज मागणी अर्ज घ्यावेत. महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवनेरी गेट समोर गुळ मार्केट, लातूर येथे अर्ज विनामुल्य उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच लाभार्थ्यांने स्वत: आवश्यक कागदपत्रांसह अर्ज कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन  जिल्हा व्यवस्थापक रमेश दरबस्तेवार यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने