वेदना व त्याच्या होणा-या संवेदना
आयुष्यात कसलीही वेदना झाली नाही असा माणूस आपण शोधायला निघालो, तर एकही माणूस भेटणार नाही तर भेटणाऱ्या प्रत्येक माणसाची कहाणी वेदनेशिवाय पूर्ण होणार नाही. काही माणसं खूप सहनशील संयमी असतात याचा अर्थ असा नाही कि त्यांना वेदना होत नाहीत असे नाही किंवा होणाऱ्या वेदनांची तीव्रता कमी असते असेही नाही. त्यांच्या अंगी निर्माण झालेली सहनशीलता आणि त्यांच्या मनाची खंबीरता ही गतकाळातील वेदनादायी अनुभवातूनच निर्माण झालेली असते. ग्रामीण भागात किंवा शेतात वाडी वस्तीवर राहणाऱ्या प्रत्येकाला रोज वेगवेगळ्या प्रकारच्या किडी- कीटकांच्या दंशाचा सामना करावा लागतो. उदाहरणच द्यायचे झाले तर लहानपणी अगदी पहिल्या वेळी कुणाला विंचू चावला असेल, त्यांनी तेव्हाची वेदना कायम स्मरणात ठेवली असेल व ती इतकी भयंकर होती कि मी शब्दात सांगायचे झाले तर मला सांगता येणार नाही असे ते म्हणतील . पुढे त्यांना अनेक वेळा विंचू दंश झाला असेल पण त्या वेदनेची तीव्रता तितकीच असे सांगतील. मात्र त्या वेदनेची सवय होत गेली आणि तशा वेदनेची आपल्याला त्याबाबतीत सहनशीलता वाढत गेली असेही कांहीं जण सांगतील. वेदना तात्पुरत्या स्वरूपात असतात ही एकदा खात्री पटली, की वेदनांची भीती कमी होते आणि मनाची खंबीरता वाढत जाते.
वेदनेने असह्य झालेल्या माणसाला आपल्याला किती प्रमाणात वेदना होतात हे फक्त त्याला स्वतःलाच माहीत असते. वेदना मोजण्याचे यंत्र अजून तरी अस्तित्वात झाले नाही. प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार वेदनांची तीव्रता सांगत असतो पण एखाद्या आघाताने किती वेदना होतात हे ज्याला अनुभवातून माहीत असते तोच माणूस त्या आघाताने पीडित असलेल्या माणसाच्या वेदना जाणू शकतो. म्हणजेच अनुभवातूनच माणूस अधिकाधिक संवेदनशील बनत जातो. त्यातूनच संवेदनशील माणसे समाजातील दुःखी दुर्बलांचा आधार बनतात. वेदनांचा पाढा एकमेकांसमोर गात अनेकांना सहानुभूती मिळवण्याची जणूकाही सवय असते. मन मोकळे केल्याने दुःख हलके होते, असे म्हणतात. परंतु काही लोक आयुष्यभर फक्त विव्हळत बसतात. त्याने दुःख हलके होण्याऐवजी आणखी वाढते. वेदना कोणतीही असो शारीरिक अथवा मानसिक, त्या वेदनांमुळे कोसळून न जाता त्या वेदनांपासून सकारात्मक धडे घेऊन आपल्या मनाची खंबीरता वाढवत जाणारा खरा संवेदनशील माणूस बनत असतो.वेदनेने पछाडलेल्या माणसाला तत्सम वेदनेचा अनुभव घेतलेला संवेदनशील माणूसच आधार देऊ शकतो. आपण जर पाहिले तर कोणत्याही महान व्यक्तीचे चरित्र वाचा त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक वेदनादायी अनुभवातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झालेली असते. वेदना हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, हे पहिल्यांदा आपण स्वीकारले की आपल्याप्रमाणे इतरांनाही वेदना होतात ही आपल्यातली संवेदनशीलता जागृत होते. त्या क्षणी माणूस बनण्याच्या प्रक्रियेत आपण एक पाऊल उचललेले असते.
म्हणूनच माणसाच्या आयुष्यात वेदना व संवेदनशीलता असेलच व ती संयम संवेदनशीलता ठेवावीच लागते.
@किशोर जाधव
टिप्पणी पोस्ट करा