विक्रम काळे हे शिक्षकांच्या समस्यांची जाणीव असलेले शिक्षक आमदार कोणाच्याही मोहाला बळी न पडता आ.काळे यांनाच पहिली पसंती द्या-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे आवाहन
उस्मानाबाद-महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांची निर्भत्सना करण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या एका आमदाराने केले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची शिक्षकांविषयी काय भूमिका आहे हे समोर आलेले आहे. भविष्यातला महाराष्ट्र कसा असला पाहिजे, शिक कोणत्या विचाराचा असला पाहिजे याची उत्तम जाण असलेले शिक्षक आमदार विक्रम काळे हे आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या हिताची जाण असलेला शिक्षक आमदार मतदारांनी विधान परिषदेत पाठवावा. शिक्षक मतदारांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता विक्रम काळे यांनाच पहिल्या पसंतीचे मतदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ उस्मानाबाद येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित शिक्ष मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, माजी आ.राहुल मोटे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, विश्वास पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आ.कैलास पाटील, खंडेराव जगदाळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, अशोक पवार, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, राष्ट्रवादीचे युवा नेते डॉ.प्रतापसिंह पाटील, प्रदेश सचिव मसूद शेख, काँग्रेसचे जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, कार्याध्यक्ष खलील सय्यद, शेकापचे भाई धनंजय उद्धवराव पाटील, आर. डी. सूळ, रामचंद्र आलुरे, आदित्य पाटील, प्राध्यापक संघटनेचे डॉ. कदम, डॉ.शौकत पटेल, डॉ.संजय कांबळे, कळंब तालुकाध्यक्ष भवर, महेंद्र धुरगुडे आदीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकार्यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जयंतराव पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच क्षेत्रात बहुजन समाजाच्या हिताला प्राधान्य दिले. गेल्या तीन वर्षापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप, रिपाइं महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या भयंकर काळातदेखील एकाही कर्मचार्यांचे वेतन रोखले नाही.
आज महाराष्ट्राच्या सत्तेत बसलेल्या भाजपा सरकारमधील मंत्री भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, भाऊराव पाटील यांनी ज्या संघर्षातून संस्था उभ्या केल्या. त्यांच्यासह महापुरुषांवर आक्षेपार्ह विधाने करुन चिखलफेक करत आहेत. चुकीच्या विधानाबद्दल राज्यपालांचा निषेध करण्याचे धाडसही कोणी दाखवले नाही. म्हणजेच महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अवमान करुनही राज्यपालांचे भाजपाने समर्थनच केले. सिनेमामधूनही महापुरुषांच्या इतिहासाचे विकृतीकरण करुन ते पुढे अभ्यासक्रमात आणण्याचा डाव दिसत आहे. छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षणाची बीजे रोवली. त्याला मूठभर लोकांनी विरोध केला तरी संपूर्ण देशाने ही संकल्पना स्वातंत्र्यानंतर स्वीकारली. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणार्या महाराष्ट्रातील इतिहासाची मोडतोड करुन नवा इतिहास निर्माण करण्याचे षडयंत्र आखले जात आहे, त्यामुळे जनतेने वेळीच सावध होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण जसे मताधिक्याने विजयी झाले त्याप्रमाणेच विक्रम काळे यांनाही भरघोस मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आ.विक्रम काळे म्हणाले की, शिक्षकांचे प्रश्न सभागृहात मांडण्याचे काम प्रामाणिकपणे केले. वेळोवेळी सकारात्मक भूमिका घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या तीन निवडणुकांमध्ये विरोधकांनी काहीही टिका केली तरी त्याला उत्तर दिले नाही. बिनकामाच्या टिकेला उत्तर देण्यात वेळ घालवला नाही. 2009 मध्ये कायम हा शब्द वगळण्यासाठी आंदोलन हाती घेतले. आपले सरकार सत्तेत होते. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री मंडळातील जयंतराव पाटील, पतंगराव कदम, बाळासासहेब थोरात, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन कायम शब्द वगळण्यास सरकारला भाग पाडले. माझ्या शिक्षक बांधवाला शंभर टक्के वेतन मिळावे यासाठी रान उठविले. परंतु नंतर सरकार बदलले आणि राजकीय द्वेषातून आघाडी सरकारचा निर्णण फिरविण्याचे काम विरोधकांनी केले. आता गुजरात पॅटर्न आणण्याची भाषा राज्यातील सरकार करत असले तरी हा प्रयत्न आम्ही हाणून पाडला. कोरोना काळात महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली. या काळात शिक्षकांच्या 28 आजाराच्या यादीत समावेश करुन शिक्षकांना उपचाराची व्यवस्था केली. त्यामुळे कोरोनाकाळात हजारो शिक्षक बंधू भगिनींना मोठा दिलासा मिळाला. संचमान्यतेच्या प्रकरणातही सरकारला तीन वर्षापासून पाठपुरावा करुन निर्णय घेण्यास भाग पाडले.
प्रास्ताविकात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत माझी पेन्शन बंद करा अशी भूमिका घेणारे विक्रम काळे हे महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक आमदार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचा आ.काळे यांना पाठींबा
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य स्वराज्य शिक्षक संघ उस्मानाबाद जिल्हा शाखेने आ.विक्रम काळे यांना जाहीर पाठींब्याचे पत्र कार्यक्रमात सुपुर्द केले.
महाविकास आघाडी आ.काळे यांच्या पाठीशी खंबीर - ओम राजेनिंबाळकर
मराठवाड्यातील कोणत्याही शिक्षकाच्या सुख-दुःखात आ.विक्रम काळे नेहमीच सहभागी राहिलेले आहेत. उस्मानाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील शिक्षकांच्या सतत संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेले आहे. यापुढील काळातही ते शिक्षकांच्या प्रश्नासाठी कायम संघर्ष करत राहतील यात शंका नाही. म्हणून महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असे शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
शिक्षकांचे प्रश्न महाविकास आघाडीच सोडवू शकते - मधुकरराव चव्हाण
भारतीय जनता पार्टीचे सरकारला शिक्षकांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची धमक फक्त महाविकास आघाडीमध्येच आहे. म्हणून सरकारमध्ये असताना नेहमीच शिक्षकांच्या हिताचा विचार केला. आता 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि अद्यापही सुरूच आहे. शिक्षकांना जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आपण स्वतः पेन्शन नाकारली आहे. कोण कुठल्या संघटनेत काम करतोय हे कधीच पाहिले. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाचे काम झाले पाहिजे हीच आपली भूमिका राहलेली आहे. उस्मानाबादसह राज्यातील चार जिल्ह्यात शिक्षकांच्या जीपीएफ खात्यात रक्कम जमा होत नाही. याकरिता सातत्याने पाठपुरावा करुन हे काम अंतिम टप्प्यापर्यंत आणलेले आहे. त्यामुळे शिक्षकांनी मतदानावर बहिष्कार न टाकता सर्वांनी मतदान करुन हे काम मार्गी लावण्यासाठी संधी द्यावी. आम्ही काय केले अशी विचारणा करणार्या सत्ताधारी भाजपाला मत मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. म्हणून येत्या 30 तारखेला शिक्षक मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी तर सूत्रसंचालन प्रा अमोल दीक्षित यांनी केले.या मेळाव्यास प्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक, निदेशक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा