सिंधुताई कापरेंच्या संकल्पनेतून लातूरकरांना महाराष्ट्र संस्कृतीचे दिव्य दर्शन...


सिंधुताई कापरेंच्या संकल्पनेतून लातूरकरांना 
महाराष्ट्र संस्कृतीचे दिव्य दर्शन... 
वारकरी संप्रदायाचा सन्मान करत लातुरात शिवजयंती उत्साहात साजरी 






लातूर : कायम इतरांना  आपल्या सहकार्याचा , मदतीचा हात देणाऱ्या श्रीमती सिंधुताई कापरे यांच्या संकल्पनेतून लातूरकरांना  शिवजयंतीदिनी महाराष्ट्र संस्कृतीचे अक्षरशः दिव्य दर्श झाले. लातूरचा श्रीमंत गणपती चॅरीटेबल  ट्रस्टद्वारा संचलित धाडस ढोल ताशा पथक मित्र मंडळाच्या वतीने वारकरी संप्रदायाचा सन्मान करत लातुरात आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती उत्सव २०२३ साजरा करण्यात आला. अत्यंत नेत्रदीपक व मन भारावून टाकणाऱ्या मंगलमय वातावरणात १०१ मृदंग वादक व ५०१ टाळकऱ्यांनी छत्रपती शिवरायांना अनोखी, आगळीवेगळी मानवंदना दिली. हा सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी  हजारोंच्या संख्येने शिवभक्त लातूरकरांनी छत्रपती शिवाजी चौकात प्रचंड गर्दी केली होती. 
 आज सगळ्यांना डीजे - मोठ्या कर्णकर्कश्श आवाजाच्या बँडने पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यास भाग पाडल्याचे  दिसून येते. मात्र,अशा अनावश्यक बाबींना फाटा देत लातूरचा श्रीमंत गणपती चॅरीटेबल  ट्रस्टद्वारा संचलित धाडस ढोल ताशा पथक मित्र मंडळाने यावर्षीचा शिवजयंती उत्सव भारतीय संस्कृती, परंपरेला साजेल असा साजरा करण्याचा चंग  बांधला होता. सिंधुताई कापरे यांचीही संकल्पना हा उत्सव वारकरी संप्रदायाचा सन्मान करत साजरा व्हावा अशी ओटी. सिंधुताई कापरे कायम वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी तत्पर असतात. आपल्या मातोश्रींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांनी ६० गावातील वारकरी संप्रदायाला टाळ , मृदंग, वीणा अशा भजन साहित्याचे वितरण केले आहे. केवळ एवढेच नव्हे तर त्यांच्या मातोश्रीनी वारकरी संप्रदायातील पाच हजारांहून अधिक महिला - भजनी मंडळांना सातत्याने आवश्यक ती मदत करण्याचे काम केले आहे. 
लातूरच्या शिवाजी चौकात उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, पंढरपूरचे सह अध्यक्ष हभप. गहिनीनाथ महाराज औसेकर, हभप. विद्यानंद सागर महाराज,  शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष  माजी खा. डॉ. सुनील गायकवाड, हभप. दत्तात्रय पवार गुरुजी, आ. अभिमन्यू पवार,  लातूर आयएमए चे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, डॉ.शिवाजी काळगे , श्रीमती सिंधुताई कापरे, किशोर मामडगे,  रमेश भारती , प्रा. चंदनकुमार सर   आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून धाडस ढोल ताशा पथक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शिवजयंती चा हा सोहळा सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. तालबद्ध स्वर निनादात १०१ मृदंग वादक व ५०१ टाळकऱ्यांनी शिवरायांना मानवंदना दिली. त्यावेळी छत्रपतींच्या नावाचा जयघोष जणू आसमंत भेदत असल्याचे पाहायला - ऐकायला मिळाले. यावेळी हभप. गहिनीनाथ महाराज औसेकर, हभप. विद्यानंद सागर महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात माऊलींच्या छत्रीचे मानकरी नागनाथ  बुड्डे , वै. भारत महाराज बरुरे यांचे वंशज डॉ. रामदास बरुरे यांचा सन्मान करण्यात आला. 
आजच्या तरुणाईने पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण बाजूला सारून आपल्या भारतीय संस्कृतीचे अनुकरण करावे, वारकरी संप्रदायाचा वारसा तेवढ्याच तन्मयतेने पुढे चालवावा, व्यसन - वाईट संगतीपासून दूर राहून आपले उज्वल भवितव्य घडवावे यासाठी या उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा सोहळा इतरांपेक्षा वेगळा करण्याचा घाट घातला होता, तो सर्वांच्या प्रयत्नाने यशस्वीही झाला.  याप्रसंगी हभप. भागवताचार्य  अमोल शास्त्री महाराज, हभप. रामकृष्ण महाराज कवठाळीकर , मृदंगाचार्य हभप. सुंदर माने गुरुजी यांचे विशेष मार्गदर्शन झाले. या सोहळ्यात कर्मवीर स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे  विद्यार्थी टाळ - मृदंग घेऊन सहभागी झाले होते. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती सोहळ्याचे स्वागताध्यक्ष एड. गोपाळराव बुरबुरे,  भाजपचे चाकूर तालुका उपाध्यक्ष पांडुरंग कोते,  लातूरचा श्रीमंत गणपती चॅरीटेबल  ट्रस्टचे संस्थापक संतोष पांचाळ,  धाडस ढोल ताशा पथकाचे अध्यक्ष अनंत पांचाळ,  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रणजित मुंडे, शाम जाधव, उमेश धर्माधिकारी यांसह उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने