सत्ताधार्‍यांच्या विरोधात एकजुटीने काम करून बाजार समितीला पूर्वीचे लौकिक मिळवून देऊ - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 सत्ताधार्‍यांच्या विरोधात एकजुटीने काम करून

बाजार समितीला पूर्वीचे लौकिक मिळवून देऊ
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर


लातूर -लातूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या माध्यमातून व्यापारी, माथाडी कामगार व शेतकर्‍यांचा चौफेर विकास करण्यासाठी सभापती असताना आपण सक्रीयपणे काम केलेले आहे. या कामाच्या माध्यमातून मुंबई पुण्यानंतर लातूर बाजार समितीही राज्यात तिसर्‍या क्रमांकावर आलेली आहे. मी 1993 पर्यंत लातूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीचा सभापती म्हणून कार्यरत होतो. तेव्हा माथाडी कामगार महिला संघटना तयार करून महिला कामगारांना न्याय देण्याचे काम केले. कामगारांसाठी माथाडी बोर्ड लागू केला. यामुळे कामगारांची दिवाळी गोड होऊ लागली. परंतु नंतर 28 वर्ष मार्केट कमिटी सत्ताधार्‍यांकडे असतानाही त्यांनी साधी एक वीटही रचण्याचे काम केलेले नाही. त्यामुळे यापुढील कालावधीतही सत्ताधार्‍यांच्या विरोधात एकजुटीने काम करून लातूर बाजार समितीला पूर्वीचे नावलौकिक मिळवून देऊ असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते कृषी उत्पन्‍न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी आडत व्यापारी पुनीत बलदवा, रमेशजी पंड्या, अजय दुडिले, दिनकर पाटील मसलगेकर, कव्ह्याचे उपसरपंच किशोर घार, लक्ष्मण साखरे, भालचंद्र दानाई, दत्तात्रय गंभीरे पाटील, चंद्रवर्धन खंदाडे, संतोषराव जाधव, ज्ञानेश्‍वर जाधव, गोविंद यादव, पुरूषोत्तम बजाज, पितांबर धुमाळ, पांडुरंग जगताप, मनोज यंके, पांडुरंग बेडदे, अभिजित देवणे, हमाल मापाडी, गाडीवान संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद, नंदकिशोर सोनी, मोहनराव भोसले, दिलीप आवस्कर,  हेमंत दिनकरराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले, लातूर बाजार समितीचा चौफेर विकास करण्याचे काम सोनवणे इतर पदाधिकारी व आम्ही केलेले आहे. बाजार समितीच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा परिणाम लातूर महानगरपालिका व विधानसभेवरही होतो. त्यामुळे शेतकरी केंद्रबिंदू समजून बाजार समितीचा विकास करण्याचे काम केले. मी सभापती असताना लातूर बाजार समितीचे उत्पन्‍न वार्षिक 22 लाख रूपये होते तर सभापती कार्यकाल पूर्ण होताना हे वार्षिक उत्पन्‍न साडे सहा कोटीवर गेलेले होते. त्यामुळे बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी विधायक निर्णय घेणे महत्त्वाचे आहेत. बाजार समिती कामगारांसाठी बाभळगाव रोड परिसरात गौरीशंकर गृहनिर्माण संस्था उभारून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याहस्ते या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. खर्‍या आर्थाने त्यावेळी साडेचार हजारात मिळालेले प्लॉट 10 ते 15 लाखापर्यंत गेले आहेत. लातूर मुख्य मार्केट यार्ड, मूरूड उपबाजारपेठ, रेणापूर उपबाजार समिती, पानगाव उपबाजारपेठ, जनावर बाजार, मुलांसाठी वसतिगृह असे अनेक प्रकल्प आपल्या कार्यात उभारले गेले. त्यामुळे यापुढील कालावधीतही व्हिजनरी मार्केट कमिटी निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकजूटीने काम करणे गरजेचे आहे. त्या कामावरती जनतेपर्यंत जाऊन व्यापारी शेतकरी व कामागारांचे हित जोपासण्याचे काम आपण करू असे आवाहनही ते यावेळी बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
कार्यक्र्रमाच्या प्रारंभी भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा सत्कार बलदवा यांच्याहस्ते करण्यात आला.  यावेळी लातूर मार्केट यार्डातील व्यापारी, कामगार व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने