पोद्दार हॉस्पिटलने रुग्णांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम केले आहे : आ. विक्रम काळे
लातूर : लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या डॉ. अशोक पोद्दार यांच्या पोद्दार हॉस्पिटलने सर्वसामान्य रुग्णांच्या मनात विश्वासार्हता निर्माण करण्याचे मौलिक कार्य केले आहे, असे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले.
लातूर येथील ख्यातनाम अस्थिशल्य चिकित्सक डॉ.अशोक पोद्दार यांच्या पोद्दार एक्सीडेंट अँड ट्रॉमा केअर सेंटरच्या वतीने व पुण्याच्या संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशनचे डॉ. पराग संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन शनिवारी सकाळी आ. विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. पराग संचेती, डॉ.सिद्धार्थ अय्यर, डॉ. शैलेश देशमुख, डॉ.अशोक पोद्दार, डॉ.डी.एन. चिंते, डॉ. दीपक गुगळे, डॉ. चेतन सारडा, माजी उपमहापौर कैलास कांबळे, बालाप्रसादजी सारडा, जयेश बजाज, जितेश बजाज, प्रसाद उदगीरकर, मिनुसेठ अग्रवाल, राजू मिणियार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलनाने या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आतापर्यंत आयोजित करण्यात आलेले हे १३५ वे तर डॉ.संचेती हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे पाचवे मोफत अस्थिरोग शिबीर आहे .
यावेळी आपले विचार व्यक्त करताना आ. विक्रम काळे पुढे म्हणाले की, डॉ.संचेती आणि लातूरचे फार पूर्वीपासून अत्यंत जिव्हाळ्याचे नाते राहिलेले आहे. लातूरचे सुपुत्र तथा राज्याचे तत्कालीन सहकार मंत्री दिवंगत केशवराव सोनवणे यांच्या सहकार्याने डॉ. के.एस. संचेती यांच्या पुण्याच्या शिवाजीनगरमधील हॉस्पिटलला जागा मिळवून देण्यात आली होती. तेव्हापासून लातूरचे आणि संचेती परिवाराचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. आपल्या सर्वोत्कृष्ट स्वास्थसेवेच्या बळावर संचेती हॉस्पिटलने रुग्णांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण केली आहे. म्हणून अपघातग्रस्त रुग्ण कितीही गंभीर जखमी असला तरी त्याला अत्यंत विश्वासाने संचेती हॉस्पिटलला पाठवले जाते आणि तो तंदुरुस्त होऊन परततो,असा अनेकांचा अनुभव असल्याचे आ. काळे यांनी सांगितले. लातूरच्या डॉ. अशोक पोद्दार यांच्या आरोग्य आणि सामाजिक कार्याविषयी अधिक काही बोलण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण आरोग्य आणि सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या हॉस्पिटलच्या वतीने सातत्याने अशा प्रकारच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जाते हे सर्वज्ञात आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. पराग संचेती यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.अशोक पोद्दार यांच्या कार्याची महती कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे आम्ही पुण्याहून लातूरला येतो, यापुढे त्यांनीही लातूरहून पुण्याला येऊन त्यांच्या पद्धतीने नियोजनबद्ध शिबिर आयोजनाचा अनुभव आम्हालाही द्यावा असे सांगितले. डॉ.संचेती हॉस्पिटल आणि डॉ. पोद्दार हॉस्पिटलचे नाते अत्यंत दृढ विश्वासाचे आहे. या मोफत शिबिराच्या माध्यमातून काही रुग्णांच्या शस्त्रक्रिया आपल्या हॉस्पिटलमध्ये अत्यंत सवलतीच्या दरात करून देऊ. जे रुग्ण तेवढेही शुल्क देऊ शकत नाहीत त्यांच्या शस्त्रक्रिया आपण मोफत करून देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. अशोक पोद्दार यांनी याप्रसंगी आपले मत व्यक्त करताना आपण नेहमी रुग्णसेवेस प्राधान्य देण्याचे काम करत असल्याचे नमूद केले. आतापर्यंतच्या १३५ मोफत अस्थिरोग तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या हजारो रुग्णांना आपण मोफत, काहींना सवलतीच्या दरात तपासणी - उपचार केले आहेत. शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना औषधीही मोफत देण्यात येते. आजच्या शिबिरातही हाडांच्या ठिसूळतेची तपासणी मशिनद्वारे मोफत करण्यात आली. तसेच डिजिटल एक्सरे , रक्त तपासणी ५० टक्के सवलतीत केली असून एमआरआय, सिटीस्कॅन, सोनोग्राफी तपासणी २५ टक्के सवलतीत केली गेल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन डॉ. गणेश बेळंबे यांनी केले. याशिबिरात सहभागी झालेल्या ३८४ हुन अधिक रुग्णांची तपासणी डॉ. पराग संचेती, डॉ. सिद्धार्थ अय्यर, डॉ. अशोक पोद्दार, डॉ.शैलेश देशमुख, डॉ. इम्रान कुरेशी यांनी केली. त्यांना फिजिओथेरपिस्ट डॉ. पल्लवी जाधव, डॉ .रेणुका पंडगे यांनी सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा