कोणत्याही प्रकारची फीस न घेता ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांची वकिली करणार : आ. पवार
लातूर : सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे पालकत्व स्वीकारण्यास आपण तयार असून आगामी काळात कोणत्याही प्रकारची फीस न घेता ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांची वकिली करणार असल्याचे प्रतिपादन औश्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांनी केले.
औसा येथे आयोजित करण्यात आलेल्या लातूर जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या ३८ व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी आ. पवार आपले मनोगत व्यक्त करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष डॉ. ब्रिजमोहन झंवर हे होते. या अधिवेशनाचे आयोजक विकास वाचनालय व कै. रामदास नायक वाचनालय औसा हे होते. सदर अधिवेशन औसा शहरातील मुक्तेश्वर मंगल कार्यालयात संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सतीश बाजपाई, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सोमनाथ रोडे, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले , जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हावगीराव बेरकीळे , कोषाध्यक्ष प्रभाकर कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते कै . मारोती चिरके आदर्श ग्रंथपाल पुरस्कार सूर्यकांत जाधव याना तर कै . कै . एड. त्र्यंबकदास झंवर ( काका ) आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार डॉ. गजानन कोटेवार यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी भारतीय संस्कृतीला अनुसरून ग्रंथालय क्षेत्रात कार्यरत महिला भगिनींनी आ. अभिमन्यू पवार यांचे औक्षण करून त्यांना ओवाळणीच्या रूपाने ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याची मागणी केली.
कै .त्र्यंबकदास झंवर काका केवळ राजकीयच नव्हे तर ग्रंथालय चळवळीचेही आदर्श नेते होते. आमच्यात अत्यंत स्नेह आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. सर्वप्रथम आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो असे सांगून आ. अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की, ग्रंथालय क्षेत्राच्या अनुदानात ६० वाढ केल्याबद्दल आपण आमदार या नात्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे अभिनंदन करतो. आपल्या शासनाने अनुदान वाढीची केवळ घोषणाच केली नाही तर ते अनुदान तात्काळ वितरित करण्याचे आदेशही दिले. त्यामुळे हे सरकार अत्यंत गतिमान असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रंथालय क्षेत्रातील कर्मचारी मागच्या अनेक वर्षांपासून अनंत अडचणींचा सामना करत दिवस कंठत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण चंद्रकांतदादा पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चळवळीतील नेत्यांची भेट घडवून आणतो. ही चळवळ आणि शासन यांच्यामधील दुवा म्हणून आपण यापुढील काळात सक्षमपणे काम कार्यसे आश्वासनही आ. पवार यांनी यावेळी दिले.
लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्या गाऱ्हाणी ऐकलेच पाहिजे. आपल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ग्रंथालय चळवळीतील नेत्यांनी सर्वच आमदारांच्या भेटी घेऊन त्यांच्यापुढे या अडचणी मांडाव्यात. जेणेकरून या प्रश्नांची सोडवणूक लवकर होऊ शकेल. आपण वाचन संस्कृती वाढली पाहिजे या मताचे असून ग्रंथालयाच्या अनुदानात आणखी वाढ करण्याबरोबरच ग्रंथालयांच्या दर्जाबदलाबाबतही आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सोमनाथ रोडे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना वाचनाने माणूस समृद्ध होतो, असे सांगून वाचनाची जागा कोणतेही इलेक्ट्रॉनिक माध्यम घेऊ शकत नाही असे सांगितले. कोलकाता येथे पार पडलेल्या बुक फेस्टिव्हलमध्ये थोडी थोडकी नव्हे तर तब्बल २५ कोटींहून अधिक रक्कमेची पुस्तके विकली गेली होती, हे वाचन चळवळ प्रगल्भ होत असल्याचे मूर्तिमंत उदाहरणच नव्हे काय ? अस्से डॉ. रोडे म्हणाले. ग्रंथ वाचनाने माणसाच्या विचारांची खोली वृद्धिंगत होते. पुस्तक वाचणारा अविचाराने कोणाचाही हस्तक होत नाही वा त्याचे मस्त बिघडत नाही,असे सांगून त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक ह . ना. आपटे, आचार्य अत्रे, बा.सी. मर्ढेकर, रॅम मोहन लोहिया यासारख्या साहित्यिकांची उदाहरणे प्रस्तुत केली. स्वागताध्यक्ष डॉ. सतीश बाजपाई, डॉ. गजानन कोटेवार, डॉ. ब्रिजमोहन झंवर यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे विस्तृत प्रास्ताविक प्रभाकर कापसे यांनी केले. प्रास्तविकात त्यांनी औसा तालुक्यात सलग दुसऱ्यांदा हे अधिवेशन होत असल्याचे सांगितले. लातूर जिल्ह्याची ग्रंथालय चळवळ राज्यात अग्रेसर असल्याचे नमूद करता आपल्या जिल्ह्यात सर्वाधिक १६ ग्रंथमित्र पुरस्कार विजेते आहेत. ग्रंथालय चळवळीच्या समस्या सोडवण्याकामी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचेही मोलाचे योगदान लाभले आहे. आता आ. अभिमन्यू पवारांच्या माध्यमातून उर्वरित समस्यांची सोडवणूक निश्चितपणे होईल असा ग्रंथालय चळवळीतील कर्मचारी , कार्यकर्त्यांना विश्वास असल्याने आ. पवार यांनी चळवळीच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पारदर्शन राम मोतीपवळे यांनी केले. यावेळी बीड जिल्हा ग्रंथालय संघाचे सर्व पदाधिकारी तसेच लातूर जिल्ह्यातील ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा