जयपूर फूट व हात मोफत वाटप मोजमाप शिबिराचे आयोजन : रमेश चिल्ले

 जयपूर फूट व हात मोफत  वाटप मोजमाप शिबिराचे आयोजन : रमेश चिल्ले 





लातूर :  रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई  व रोटरी क्लब , लातूर परिवार  यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० व ११ मार्च २०२३ रोजी  लातूर शहरात जयपूर फूट व हात मोफत वाटप मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब लातूर मिडटाऊनचे रमेश चिल्ले यांनी गुरुवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना दिली. 
सदर  शिबीर लातूर शहरातील औसा रोडवरील कल्पतरू मंगल कार्यालयात दि. १० व ११ मार्च २०२३ रोजी सकाळी साडे  नऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होणार आहे. शिबिराचे उद्घाटन संवेदना प्रकल्पचे कार्यवाह सुरेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे,असे सांगून रमेश चिल्ले पुढे म्हणाले की,  या सामाजिक उपक्रमात रोटरी क्लब ऑफ सेंट्रल, रोटरी क्लब लातूर मिडटाऊन , रोटरी क्लब ऑफ लातूर श्रेयस, रोटरी क्लब ऑफ लातूर, रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रो, रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझन व रोटरी क्लब ऑफ चाकूर हे रोटरी परिवार सहभागी आहेत. या उपक्रमासाठी रोटरी परिवाराने ' हर रोटेरीयन  ने ठाना  है, दिव्यांगता मिटाना  है ' हे घोषवाक्य निश्चित केले आहे. या शिबिरात सहभागी झालेल्या दिव्यांगांना रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या स्वतःच्या कारखान्यात  तयार केलेले जयपूर फूट व हात योग्यरीत्या मोजमाप करून देण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी दिव्यांगांचे मोजमाप घेण्यासाठी  अत्याधुनिक उपकरणांनी परिपूर्ण  कुशल तंत्रज्ञांची  टीम लातुरात येत असल्याचेही चिल्ले यांनी सांगितले. 
लातूर जिल्ह्यात दिव्यांगांची संख्या खूप मोठी आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्ती स्वखर्चाने जयपूर फूट किंवा हात घेऊ शकत नाहीत. अशा जास्तीत जास्त मंडळींपर्यंत पोहचण्यासाठी  रोटरी परिवारातील सर्व सदस्य सक्रिय आहेत. त्यांच्यापर्यंत  पोहोचण्याचा  प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून आपण सर्वजण करीत आहोत. याकामी रोटरी परिवाराला जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे सर्वतोपरी सहकार्य मिळत असल्याचे चिल्ले यांनी नमूद केले. रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलचे पुष्पराज खुब्बा यांनी मागच्या वर्षी घेण्यात आलेल्या जयपूर फूट शिबिरात तपासण्या करण्यात आलेल्या ४५० दिव्यांगांपैकी २४१ दिव्यांगांना जयपूर फूट उपलब्ध करून देण्यात आले होते, असे सांगितले.  जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत पोहचण्याचा आपण  व आपले सहकारी प्रयत्न करत  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोटरी क्लब ऑफ लातूर श्रेयसच्या सौ. सुनीता देशमुख यांनीही या उपक्रमाविषयी आपले विचार व्यक्त केले. यावेळी  रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रोचे रविकिरण चव्हाण, सौ. उषा शिंदे यांची उपस्थिती होती. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने