३१ लाख २९ हजार रुपयाची दंड वसूल

 ३१ लाख २९ हजार रुपयाची दंड वसूल

लातूर : प्रतिनिधी
लातूर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणा-या १ हजार ५४१ वाहनचालकांकडून ११ लाख ६८ हजार रुपयाचा दंड व पूर्वीचा दंड न भरलेल्या ५ हजार ३८९ वाहन चालकांकडून ३१ लाख २९ हजार रुपयाची दंड फेब्रुवारी महिन्यात वसूल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे निर्देशांन्वये शहरातील मुख्य चौकांमध्ये व गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून गर्दीच्या ठिकाणी मुख्य चौका-चौकात वाहतूक शाखेचे पोलिस पायी गस्त घालत आहेत. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे चालकाविरुद्ध कारवाई केली जात आहे.चालक परवाना वाहनाची कागदपत्रे तपासली जात आहेत. वाहन चालविण्याचा परवाना, मालकी हक्काचे कागदपत्रे सोबत बाळगणार नाहीत तसेच मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरणारे बुलेट चालक, चालू गाडीवर मोबाईलवर संभाषण करणा-या चालकावर वाहतूक पोलीस कठोर कारवाई करीत आहेत. लातूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम व त्यांच्या पथकाने फेब्रुवारी महिन्यात अवैध प्रवासी वाहतूक, बुलेट सायलेन्सर, कर्कश हॉर्न, काळीपिवळी टॅक्सी, फॅन्सी नंबर प्लेट, विना नंबर प्लेट वाहने, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने वाहन चालवणा-या तसेच नो पार्किंग, मोठ्या आवाजाचे मॉडीफाय सायलेन्सर असलेल्या १ हजार ५४१ वाहनचालकांवर केसेस करून ११ लाख ६८ हजार ६५० रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच यापूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने ऑनलाइन दंड आकारण्यात आले होते.संबंधित वाहन चालकांनी सदरचा दंड भरणे अपेक्षित असतानाही त्यांनी दंड जमा केला नाही अशा ५ हजार ३८९ वाहन चालकाकडून ३१ लाख २९ हजार मागील अनपेड दंड जमा करण्यात आला आहे. तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करणा-या वाहनचालकाकडून दंड आकारण्यात सोबतच वाहतूक नियमांचे पालन करण्याची विनंती लातूर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने