प्रभू श्रीरामचंद्रांचे शक्तिशाली विचार त्रिलोकाचे कल्याण होईल - माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर -जगामध्ये सर्वांना प्रेरणा देणारे प्रभू श्रीरामचंद्रजी यांची जयंती, आजचा दिवस पवित्र, प्रेरणादायी व आदर्शाचा दिवस आहे. या माध्यमातून पृथ्वीतलावर परमेश्वर ऋषीमुनीच्या माध्यमातून वेदांची सुरुवात झाली. वेदांमध्ये अध्यात्म, विज्ञान, संस्कार व मानवता आहे. हे विचार मानवाला शक्ती देण्याचे काम करतात. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास पूर्ण करून मानवतेच्या दृष्टिकोनातून भगवान शंकराचा भक्त रावणातील त्याचा अहंपणा, दुराचार संपविण्याचे कार्य केले. प्रभू श्रीरामांच्या शक्तीशाली विचारातून व कार्यातून त्रिलोकाचे कल्याण होईल असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.यावेळी ते श्रीराम नवमी जयंती उत्सव 2023 निमित्त स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेज महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेएसपीएम संस्थेचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील, समन्वयक संचालक बापूसाहेब गोरे, प्राचार्य आर.एस.अवस्थी, महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक आप्पासाहेब पाटील, प्रा.डॉ.सतीश यादव, प्राचार्य सच्चिदानंद जोशी, प्राचार्य शिरीन मॅडम, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य संदीप पांचाळ, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य शैलेश कचरे, उपप्राचार्य मारुती सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ. कव्हेकर म्हणाले की, भगवान शंकराचा भक्त रावण आहे. सृष्टीवरील दुचाराचा दूर करण्यासाठी 10 जानेवारी 5114 मध्ये रामाचा जन्म झाला. सध्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अनेक साधू आलेले आहेत परंतु साधू कोणी बोलण्यावरून होत नाही तर त्याचे आचार, विचार, आहार, अंगत विहार व उच्चार शुद्ध असले पाहिजेत. ज्या लोकांमध्ये चांगले गुण आहेत ते खरे साधू परंतु सध्या काही साधू जेलमध्ये आहेत. फक्त भगव्या कपड्यांनी साधू होत नाही तर आचार, विचार आणि शुध्द विचाराने साधू होता येते.
सध्या अयोध्येमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर अशा राम मंदिराची सुरुवात झालेली आहे. अयोध्येत पाच हजार मंदिरे आहेत. तसेच देशातील गल्लीबोळात मंदिरे उभारण्यात येत आहेत. यातून मानवाला चांगले बनण्याची दिशा मिळत आहे. आध्यात्मातील हीच बाब लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 37 वर्षानंतर अध्यात्म, विज्ञान, योगा, संस्कार यावर आधारित सीबीसीएस शिक्षण पद्धती आणण्याचे काम केलेले आहे. या शिक्षणाच्या माध्यमातून तसेच यासारख्या विचाराच्या माध्यमातून माणूस घडविण्याचे काम होत आहे असे मतही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच प्रारंभीच प्रमुख मान्यवरांचा सत्कार जेएसपीएम संस्थेच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गोविंद शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अब्दुल गालिब शेख यांनी मानले.
यावेळी या कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पहिली पार्लमेंट मंडप निर्माण करण्याचे काम महात्मा बसवेश्वरांनी केले
बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी क्रांतिकारी विचारांच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडविण्याचे काम केलेले आहे. तसेच बाराव्या शतकामध्ये पहिल्या पार्लमेंटची निर्मिती करून स्वतः क्रांतिकारी विचार सर्वसामान्यांमध्ये रुजविण्याचे काम महात्मा बसवेश्वरांनी केले. त्यांचे हे क्रांतिकारी विचार आजच्या तरुण पिढीने आत्मसात करावेत असे आवाहनही भाजपा नेते तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
श्रीराम व श्रीकृष्णाच्या विचारसरणीवर चालण्याची गरज
श्रीराम नवमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, रामायणाच्या माध्यमातून एकच शिकवलं जातं की,जगायचं कसं, वागायचं कसं, आचार-विचार व्यवस्थित आहेत का? माणसं माणसातील संबंध कसे असावेत याचे धडे देण्याचे काम श्रीराम आणि श्रीकृष्णाने केलेले आहे. आध्यात्मिक विचारातूनच अनेक शतके येतील आणि अनेक शतके जातील परंतु काही अशी चरित्र आहेत ज्यामध्ये एकच विचार असेल राम आणि श्रीकृष्णाचा, या विचारसरणीवर सगळ्यांनी चालावं लागेल असे मौलिक विचार प्रा.डॉ.सतीश यादव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा