कृषी निविष्ठांची तपासणी आणि संनियंत्रणासाठी भरारी पथकाची स्थापना
लातूर : लातूर विभागातील शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा वेळेत व योग्य किमतीत उपलब्ध व्हाव्यात म्हणून गुणवत्ता नियंत्रण विभाग कार्यरत आहे. सन 2023-2024 खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठांची तपासणी आणि संनियंत्रण अधिक परिणामकारक होण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आल्याचे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले. निविष्ठांचे वितरण योग्यरितीने होण्यास व त्याचे सनियंत्रण करण्यासाठी तालुका, जिल्हा तसेच विभाग स्तरावर भरारी पथके स्थापन केली जातात.
या भरारी पथकात तंत्र अधिकारी(गुण नियंत्रण) पी.व्ही.भोर पथक प्रमुख, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एस. एच. मोरे सदस्य सचिव तर कृषी अधिकारी (निविष्ठा पुरवठाचे कामकाज पाहणारे) ए. एन. तिडके आणि वैधमापनशास्त्रचे प्रतिनिधी पथकातील सदस्य आहेत.
संपूर्ण विभागात सर्व निविष्ठांचे व्यवस्थित वाटप व चांगल्या प्रतीच्या निविष्ठा शेतकऱ्यांना मिळतील, शेतकऱ्यांची निविष्ठांसाठी अडवणूक होणार नाही यासाठी भरारी पथक काम करणार आहे. त्याचबरोबर कृषी निविष्ठा विक्रीमध्ये गैरव्यवहार, साठेबाजी, जादा दराने विक्री असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास उत्पादक, विक्रेत्यांचे परवाने निलंबित, रद्द करण्यासाठी परवाना प्राधिकाऱ्याकडे प्रस्ताव देणे, तसेच गैरव्यवहाराचे स्वरुप गंभीर असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करणे, यासारखे गुण नियंत्रण कामासाठी खात्याने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे भरारी पथकाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा