तणावमुक्त जीवन हीच आरोग्याची गुरुकिल्ली-जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे प्रतिपादन
लातूर दि.०७ - पाहिलेले स्वप्न काही वेळा पूर्ण होत नाहीत वाटते तसे होत नाही यामुळे टोकाची भूमिका घेऊन अनेक जण मानसिक ताण तणावातून आत्महत्या करतात अशा आत्महत्येचे प्रमाण कोरोनात मृत्यू पावलेल्या पेक्षा अधिक आहे. तणावमुक्त जीवन हीच आरोग्याची गुरुकिल्ली असल्याने प्रत्येकानी मानसिक (मेंटल) आणि भावनिक (इमोशनल) आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपले आरोग्य सुदृढ कसे राहिले यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी केले.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ७ एप्रिल शुक्रवार रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या रोप्य महोत्सवी वर्षा निमित्त लातूर शहरातील विविध वैद्यकीय शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी रॅली काढली. या रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय परिसरातून काढण्यात आलेल्या या रॅलीला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
यावेळी लातूर एमआयटी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एन.पी. जमादार, शैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे, उपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, शैक्षणिक व प्रशासकीय संचालिका डॉ. सरिता मंत्री, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल राठी, सचिव डॉ. आशिष चेपूरे, यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ. चंद्रकला पाटील, एमआयटी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य सर्वानन सेना, राष्ट्रीय स्वयंसेवा योजनेचे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर डिघोळे, एमआयटी फिजिओथेरपी कॉलेजच्या डॉ. पल्लवी जाधव, बी.व्ही. काळे मांजरा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी डॉ अनंत पवार रविकिरण नाईकवाडे, एस. व्ही. एस. एस. कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य वीरेंद्र मेश्राम, वसंतराव काळे आयुर्वेदिक होमिओपॅथिक कॉलेजचे डॉ. अतुल कुलकर्णी, महाराष्ट्र नर्सिंग कॉलेजचे उपप्राचार्य मोहम्मद एजाज नवाज आणि ग्रामीण रुग्णालय प्रशासक अधिकारी श्रीपती मुंडे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
देशात तरुणांची संख्या अधिक असल्याने देश तरुण आहे या तरुणामुळे देश घडणार आहे त्यामुळे तरुणांनी स्वतःला आणि समाजाला घडविण्याचा प्रयत्न करावा असे सांगून जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात लातूर पॅटर्न हे राज्यात नाही तर देशभरात नावाजलेले आहे मात्र या क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विषय खूप महत्त्वाचा आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून त्रास होणार नाही खचून जाणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.
आयुष्यात पुढे जाताना तणाव मुक्त जीवन जगले पाहिजे असे सांगून यावेळी बोलताना श्री. सोमय मुंडे म्हणाले की, हाती घेतलेल्या विषयाला वेळ दिला पाहिजे योग्य दिशेने काम केले तर मानसिक तणाव येत नाही. जीवनाच्या कसोटीत प्रयत्न करूनही अपयश आले तर, हा ही काळ निघून जाईल अशी मानसिकता असली पाहिजे. उद्योग व्यवसाय कौटुंबिक शैक्षणिक कोणत्याही बाबतीत मानसिक तणाव आल्यास प्रत्येकाने स्वतःला स्वतःतच शोधावे. ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत अशा ग्रंथात गुंतून राहावे. मंदिर, मस्जिद मध्ये जाऊन सेवा करावी निश्चित मानसिक समाधान मिळते. नियमित प्राणायाम केल्याने शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते.
यावेळी एमआयटी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठता डॉ. एन. पी. जमादार शैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने निरोगी शरीर आणि अवयव दान याबाबतची माहिती दिली. बी. व्ही. काळे आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून विविध आजाराची वेळीच काळजी घेण्याचे आणि तणावमुक्त जीवन जगण्याचे प्रबोधन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिलेश जोशी आणि श्रेया कुलकर्णी केले तर शेवटी दत्ता गायकवाड आणि ईश्वरी कांदे यांनी आभार मानले.
या रॅलीत एमआयटी मेडिकल कॉलेज, बी.व्ही. काळे मांजरा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, महाराष्ट्र काँलेज आँफ सायन्स नर्सिंग कॉलेज, एमआयटी नर्सिंग कॉलेज, वसंतराव काळे होमिओपॅथी कॅलेज, एमआयटी फिजीओथेरपी कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता.
टिप्पणी पोस्ट करा