क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावचे रहिवाशी श्रीमती राधाबाई दामोदरराव सावरकर या दांपत्याच्या पोटी 1883 च्या 28 मे रोजी पुत्ररत्न जन्मले. तेच क्रांतीकारी व क्रांतिकारांचे मसिहा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदरराव सावरकर तथा स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर होय. त्यांना एक मोठा व एक लहान भाऊ होते तर एक बहीण होती. ते नऊ वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले तर वडिलाचे 1899 साली निधन झाले. ते त्यांचे मोठे भाऊ बाबाराव बरोबर शिक्षणासाठी नाशिकला राहिले होते. त्यांनी एकाच वर्षात तीन इयत्ता पास केल्या होत्या. त्यांना लहानपणापासूनच वाचन लेखन भाषण व कविता करण्याचा छंद होता. त्यांनी लहानपणीच हरिविजय रामविजय रामायण महाभारत भागवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इत्यादी वाचून काढले होते. इंग्रज अधिकारी रँडचा खून केल्याच्या आरोपावरून चाफेकर बंधूना फाशीची शिक्षा झाली होती. त्यांच्यावर अवघ्या 15 वर्षाच्या क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांनी ‘फटका’ रचला होता. त्यातील काही ओळी
फाशी ना ती यज्ञवेदिका रक्ते न्हाली जी तुमच्या ।
सांडोनी होवो त्याची राष्ट्ररणी सार्थक रक्ताचे तुमच्या ।
कार्य सोडोनी अपुरे पडला झुंजत खंती नको पूढे ।
कार्य चालवू गिरवूनी तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे ।
क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बालपणीच त्यांच्या घराच्या देवघरात असलेल्या अष्टभुजा देवीसमोर प्रतिज्ञा केली होती की, “माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युध्दात शत्रुस मारीन चाफेकरासारखा मरेन किंवा मातृभुमीच्या रक्षणासाठी स्वराज्याचा राज्याभिषेक करविन. यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन.”
क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर व त्यांच्या कांही मित्रानी मिळून सन 1900 साली मित्रमेळा या नावाची एक संघटना स्थापना केली होती. या मित्रमेळयाचे साध्य होते. स्वातंत्र्य व ध्येय होते. सशस्त्र क्रांती छत्रपती शिवाजी महाराज झाशीची राणी लक्ष्मीबाई लोकमान्य टिळक शि.म.परांजपे वासुदेव बळवंत फडके हे त्यांचे दैवतच होती. मित्रमेळ्याचे कार्य वाढल्याने या संघटनेचे 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झाले. अभिनव भारत ही क्रांतिकारांची जगविख्यात क्रांतिकारी संघटना होती.
क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर हे 1901 साली मॅट्रिकला असताना त्यांचा श्री भाऊसाहेब चिपळूनकरांचे कन्यारत्न श्रीमती यमुनाबाईशी विवाह झाला. विवाहाबध्द झाल्यावर्षीच ते मॅट्रिक पास झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व राहण्यासाठी फर्ग्युसन कॉलेजच्याच वस्तीगृहात प्रवेश मिळवला. ते निबंध व वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत असत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजावर कविता लिहिली होती. 1903 साली त्यांनी स्वातंत्र्याचे स्त्रोत ही कविता लिहिली. सदर कवितेतील काही ओळी अशा आहेत.
जया स्तुते श्री महन्मंगले शिवास्पदेशुभदे
स्वतंत्रे भगवति महंयशोयुतां वंदे
क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर हे युवकांचे मसिहा बनले होते. बंगालचे व्हाईर्साय कर्झन यांनी बंगालच्या फरळणीचा घाट घातला तेंव्हा बंगालच्या फाळणीचे कट्टर विरोधक व स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकराने त्या निषर्धात पुण्यात प्रचंड मोर्चा काढला. त्या मोर्चात लोकमान्य टिळक शि.म.परांजपे असे महारथीही सामिल झाले होते. क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकराने प्रचंड जनसमुदायासमक्ष विदेशी कपड्याची होळी केली. त्यामुळे फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्याने त्यांना वसतिगृहातून काढून टाकले.
क्रांतीकारी स्वातंत्र्यवीर सावरकर 1905 साली बी.ए.उत्तीर्ण झाले. बॅ.शामजी वर्मा यांनी युरोपात जाऊन शिक्षण घेणार्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ठेवली होती. क्रांतीकारी स्वातंत्र्यवीर सावरकराने त्या शिष्यवृत्तीसाठी केलेला अर्ज मंजूर झाल्याने ते 1906 च्या 3 जुलैला लंडनला पोचले व तेथील इंडिया हाऊसमध्ये राहू लागले. ते बायटन येथील समुद्र किनार्यावर बसले असता त्यांना मातृभूमिची आठवण झाली व त्यांनी कविता लिहिली. त्यातील काही ओळी अशा आहेत.
ने मजसी ने परत मातृभूमिला । सागरा प्राण तळमळला ॥
नभी नक्षत्र बहुत एक परी प्यारा । मज मातृभूमिचा तारा ॥
प्रासाद तिथे रम्य पर मज भारी । आईची झोपडी प्यारी ॥
तिजविण नको राज्य मज प्रिय साचा । वनवासा जरी तिच्यावनीचा ॥
अभिनव भारतच्या शाखेतर्फे क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे इंग्लंडमध्येही क्रांतिकारी कार्य चालूच होते. ते भारतातील क्रांतीकारी युवकांना शस्त्रास्त्रे पुरवठा करीत असत. ते शस्त्रास्त्रे घेणेसाठी त्यांचे वडिल बंधु बाबाराव हे मुंबईला गेले असता त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या इंग्रज सरकारने त्यांना पकडले व खटला दाखल केला. त्यात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. इंग्रज सरकारने त्यांना अंदमानाच्या तुरूंगात ठेवले होते. याच अभिनव भारत संघटनेवर इंग्रज सरकारने बंदी घातली होती व त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली होती.
क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकरांना 1910 च्या 13 मार्च रोजी लंडन येथे पकडून कडक बंदोबस्तात ‘मोरीया’ बोटीने फ्रांस मार्गे भारतात आणत असताना त्यांनी शौचालयाच्या खिडकीतून समुद्रात उडी टाकली पोहत जावून धक्का चढले. फ्रांसच्या भूमित प्रवेश केला. त्यांची मार्सेलिसची उडी जगभर गाजली. ते फ्रांसच्या भुमिवर असल्याने आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे त्यांना इंग्रज सरकारचे पोलीस अटक करू शकत नव्हते. परंतु फ्रेंच पोलिसांनीच त्यांना इंग्रज पोलीसांच्या ताट्यात दिल्याने त्यांना त्याच बोटीने भारतात आणले. भारतातील ज्युरिने त्यांना 2010 च्या 24 डिसेंबर रोजी दोन जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. डोंगरीच्या तुरूंगात ठेवलेल्या क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकरांना महाराजा बोटीने मद्रास मार्गे अंदमानला नेले. आगोदरच जन्मठेपेची शिक्षा झालेले त्यांचे मोठे भाऊ बाबाराव हे तेथेच शिक्षा भोगत होते. क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकरांना तेल काढण्यासाठी घाणा ओढावा लागत असे व कात्या कुटाव्या लागत असे. जेवण तर फारच निकृष्ठ असे. कधी-कधी भाजीत गोम व सापही निघत असत. त्यांना अनन्वित शारीरीक व मानसिक यातना सहन कराव्या लागल्या आहेत. अंदमानाचा तुरूंग म्हणजे साक्षात यमपुरीच त्यांच्या रोमरोमात भारतनिष्ठा होती. जननी जन्मभूमी स्वर्गादपी असं मानून त्यांनी भारत मातेसाठी असीम त्याग केला व बलिदान दिले.
भारत देशाला स्वातंत्र्य करणेसाठी 1857 साली बाहादूरशाह झाशीची राणी लक्ष्मीबाई नानासाहेब पेशवे तात्या टोपे राजा कुंवरसिंह राजा मानसिंग मंगल पांडे इत्यादी असंख्य जनानी मिळून ब्रिटिशाविरूध्द खूप मोठा लढा दिला. परंतु त्या लढाईत ते हरले. ती मोठी लढाई झाली असतनाही धुर्त ब्रिटिशांनी त्याला 1857 चे बंड तथा उठाव म्हणून तसा प्रसार केला. क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकराने 1857 चा संग्राम हा वस्तुनिष्ठ इतिहास लिहून ते 1857 चे बंड तथा उठाव नव्हता तर तो 1857 चा संग्राम होता व युध्द होते हे जगाला दाखवून दिले.
पहिले महायुध्द संपल्यानंतर भारताने इंग्रज सरकारकडे राजबंद्याच्या सुटकेसाठी जोरदार मागणी लावून धरल्याने इंग्रज सरकारने बहुतांश राजबंधाना सेाडले. त्याप्रमाणे 11 वर्षानंतर 1921 च्या 18 मे रोजी क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकरांचीही सुटका केली परंतु त्यांना रत्नागिरीत स्थानबध्द ठेवले होते. तरीही त्यांचे सामाजिक कार्य चालूच राहिले. सर्व जातीपंथाच्या लोकासाठी त्यांनी पतीत पावन मंदिर बांधले. त्यांना भेटणेसाठी राष्ट्रपिता म.गांधीजी सपत्नीक गेले होते तेंव्हा महात्माजीने बॉ.ना.म्हटले साध्वी यमुनाबाईना नमस्कार करा. अस्पृश्यांचे उध्दारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीकारकांचे मसिहा नेताजी सुभाषचंद्रजी बोस हे महान नेतेही त्याना भेटनेस गेले होते. माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयीजीने ज्यांना दुर्गा म्हटले त्या दुर्गा व माजी प्रधानमंत्री राष्ट्रमाता श्रीमती इंदिराजी गांधीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रनिष्ठेची त्यागाची बलिदानाची व स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची वाखाणगी केलेली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची 28 मे रोजी 140 वी जयंती आहे. त्या थोर स्वातंत्र्यवीराच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण वंदन व विनम्र अभिवादन!
सौ.लता युवराज मुमाने
मो.9420212701
टिप्पणी पोस्ट करा