रेणापूर संघ ठरला महाविजेता

 रेणापूर संघ ठरला महाविजेता



लातूर : लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण-टी १० च्या जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल गुरुवारी (ता. २५) जाहीर झाला असून प्रथम क्रमांकाचे मुख्य पारितोषिक रेणापूर येथील रेणुका क्रिकेट क्लबने पटकावत हा संघ स्पर्धेत महाविजेता ठरला तर उदगीर तालुक्याच्या हंसराज पाटील क्रिकेट क्लबने द्वितीय क्रमांक आणि चाकूर येथील रॉयल क्लब या संघाने तृतीय क्रमांक मिळवून यंदाच्या स्पर्धेवर आपली मोहोर उमटवली. लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण-टी १० च्या जिल्हास्तरीय स्पर्धेतील मुख्य पारितोषिकांचे वितरण लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, सौ. दीपशिखा धिरज देशमुख उपस्थित होत्या.

जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या संघास १ लाख रुपये, ट्रॉफी, प्रमाणपत्र असे पारितोषिक प्रदान करण्यात आले. द्वितीय आलेल्या संघास ५१ हजार रुपये, ट्रॉफी, प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांक मिळवलेल्या संघास ३१ हजार रुपये, ट्रॉफी, प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच, मालिकावीर पुरस्कार रेणापूर येथील बालाजी दूड्डे यांना (३ हजार रुपये), उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार रेणापूर येथील आकाश आडे यांना (३ हजार रुपये), उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार उदगीर येथील रोहन एणाडले यांना (३ हजार रुपये) देऊन गौरवण्यात आले.

लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७८ व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या पारितोषिक वितरण सोहळ््यास माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, धनंजय देशमुख, अभय साळुंके, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, ट्वेंटी वन शुगर्सचे उपाध्यक्ष विजय देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी लकडे, लातूर तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, पृथ्वीराज शिरसाट, सपना किसवे, किरण जाधव, विजय निटुरे, इम्रान सय्यद, गोविंद बोराडे, कल्याण पाटील, प्रवीण पाटील, प्रवीण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

तालुकास्तरावर बाजी मारलेले संघ
व्हीडीसीसी क्रिकेट क्लब (लातूर), रेणुका क्रिकेट क्लब (रेणापूर), एस. एच. स्पोर्ट्स अँड क्लब (औसा), धिरज भैया क्रिकेट क्लब (निलंगा), न्यू स्टार क्रिकेट क्लब (देवणी), प्रेमनाथ क्रिकेट क्लब (शि. अनंतपाळ), हंसराज पाटील क्रिकेट क्लब (उदगीर), शिवप्रतिष्ठान क्रिकेट क्लब (जळकोट), डी ब्रदर्स क्रिकेट टीम (अहमदपूर), रॉयल क्लब (चाकुर), सिद्धिविनायक क्रिकेट क्लब (लातूर शहर) या संघांनी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळवला.

क्रीडा क्षेत्राला अधिक बळकट होईल
लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप : ग्रामीण-टी १० ही स्पर्धा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला अधिक बळकट करणारी, आपल्या भागातील खेळाडूंना स्फूर्ती देणारी आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे, याचा मला आनंद आहे. यामुळे आपल्या मातीतील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील, याचा विश्वास आहे.

– अमित विलासराव देशमुख,
आमदार तथा माजी पालकमंत्री

ग्रामीण भागातील टॅलेंटला वाव देणारी स्पर्धा
गेल्या आठवडाभरापासून शहरात आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सुरू असलेली ही स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मागील वर्षाप्रमाणेच स्पर्धेला यंदाही तरुणांचा चांगला प्रतिसाद लाभला. यात ४,५०० हून अधिक तरुण सहभागी झाले. हा सहभाग उल्लेखनीय असाच आहे. यावरून सुसज्ज स्पर्धेची आवश्यकता आणि ग्रामीण भागातील टॅलेंट अधोरेखित होत आहे. तरुणांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी ही स्पर्धा अशीच यापुढे सुरू राहील.

– धिरज विलासराव देशमुख, आमदार

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने